koregaon NCP Morcha
koregaon NCP Morcha Reporter
पश्चिम महाराष्ट्र

'जरंडेश्वर'वरील छापेमारीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा कोरेगावात 'मूक मोर्चा'

राजेंद्र वाघ

कोरेगाव : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कुटुंबियांशी संबंधित विविध संस्थांसह चिमणगांव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलवर आयकर विभागाने केलेली छापेमारी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करत या कारवाईच्या निषेधार्थ आज येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढला. तसेच कोरेगाव शहरातील हिंद भवन चौकात 'रास्ता रोको' चा प्रयत्न केला.

राष्ट्रवादीचे नेते, आमदार शशिकांत शिंदे यांच्या सुचनेनुसार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, शहाजी क्षीरसागर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भास्कर कदम, कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अरुण माने, राजेंद्र भोसले, जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा पाटील, प्रताप कुमुकले, प्रतिभा बर्गे, अॅड. पी. सी. भोसले, श्रीमंत झांजुर्णे, किशोर बर्गे, राहुल साबळे, संजय पिसाळ, अमरसिंह बर्गे, अजित बर्गे, सनी शिर्के, अमरसिंह माने, प्रताप बोधे, संकेत बाबर, गणेश धनावडे, नितीन लवंगारे, सागर जाधव आदींसह कार्यकर्ते या मूक मोर्चात सहभागी झाले होते.

कोरेगाव, खटाव, सातारा, वाई तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर व वेळेत पेमेंट देऊन जरंडेश्वर शुगर मिलच्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना न्याय दिला जात आहे. अशा परिस्थितीत केवळ राजकीय सूड उगवण्यासाठी केंद्रीय संस्थांना हाताशी धरून केंद्र सरकार 'जरंडेश्वर'ला अडचणीत आणण्याचे काम करत आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराविषयी देशाचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेचा राग धरून केंद्र सरकारने राजकीय आकसापोटी ही कारवाई केली आहे.

भाजपच्या नेत्यांकडून खोटे आरोप करून उपमुख्यमंत्री पवार यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले जात आहे. यापुढे पवार कुटुंबियांवर राजकीय हेतूने कारवाई झाल्यास मोर्चा काढून तीव्र निषेध केला जाईल, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

शशिकांत शिंदेंचा इशारा

प्रकृती अस्वस्थ्यामुळे आमदार शशिकांत शिंदे आजच्या आंदोलनास उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान, त्यांनी मोबाईलवरून संपर्क साधून ते म्हणाले, "माझ्यासारखा कार्यकर्ता तसेच कोरेगांव तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे अजितदादा यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यांच्याशी संबंधितांवरील कारवाईचा आज फक्त आम्ही निषेध केला आहे. भविष्यात दादांवर किंवा 'जरंडेश्वर'वर राजकीय सूड भावनेने कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास तेवढ्याच आक्रमकतेने उत्तर दिले जाईल आणि त्यासाठी मी स्वतः पुढे असेन."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT