सोलापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचाराने मी गेली २० वर्षे सोलापुरात (Solapur) काम करत आहे. सोलापूर शहराचा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून २००३ पासून मला काम करण्याची संधी मिळाली. आजतागायत मी पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निष्ठा ठेवून आहे. पण, पक्षाची बाजू मांडत असताना माझ्यावर निलंबनाची कारवाई झाली, याचं मला वाईट वाटलं. वास्तविक राष्ट्रवादीच्या सोलापूर शहराध्यक्षांना माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकारच नाही. पण, काही लोकांच्या स्वार्थापोटी माझी पक्षातून हकालपट्टी केली. माझी हात जोडून विनंती आहे की, सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना असा त्रास देणे योग्य नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबनाची कारवाई करण्यात आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर (Prashant Babar) यांनी व्यक्त केली. (NCP's Solapur city president has no right to take action against me : Prashant Babar)
प्रशांत बाबर यांची राष्ट्रवादी काँग्रेसमधून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना बाबर यांना आश्रू अनावर झाले होते. ते म्हणाले की, पक्षाच्या कोणत्या वरिष्ठाशी बोलून तुम्ही माझ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे, याची मला माहिती हवी होती. त्यासाठी मी शनिवारपासून (ता. १२ फेब्रुवारी) शहर अध्यक्षांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांच्याशी संपर्क होत नाही.
मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याशी बोललो. ते म्हणाले की ‘प्रशांत तुझ्यावर कारवाई झाली आहे, ही गोष्टच मला माहिती नाही. कोणत्या विषयावर कारवाई झाली हेही माहिती नाही. त्यांना कल्पना द्यायला हवी होती.’ मात्र, अध्यक्षांचा फोन बंद असल्यामुळे मेहबूब शेख यांनाही त्यांचा फोन लागला नाही. पण आज माझा शहराध्यक्ष भारत जाधव यांच्याशी संपर्क झाला.
मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात चुकीचे विधान केले आहे, त्यामुळे माझ्यावर ही कारवाई झाली आहे, अशी चुकीची माहिती त्यांनी मला आज दिली. पण, माझ्याकडून असं कधीच घडणार नाही. मी असं कधी करणारही नाही. कारण जयंत पाटील आमचे नेते आहेत. शरद पवार यांच्या वाईट काळात ते खंबीरपणे उभे होते. त्यांच्याविरोधात मी कसं स्टेटमेंट देऊ. हे माझ्याकडून होणे शक्यच नाही, असेही बाबर यांनी नमूद केले.
मला कळत नाही की, माझी हकालपट्टी करण्याइतपत मी काय केले आहे. मला किमान कारणे दाखवा नोटीस द्यायला हवी होती. त्यावर माझे उत्तर आल्यानंतर कारवाई करण्याचे अधिकार होते. मी राष्ट्रवादी युवकचा प्रदेश उपाध्यक्ष आहे, त्यामुळे सोलापूर शहराध्यक्षांना माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकारच नाही. माझी हात जोडून विनंती आहे की, सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना असा त्रास देणे योग्य नाही, हे सांगताना बाबर यांना गहिवरून आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.