Dahiwadi Nagar Panchayat result sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

आमदार गोरे गटाचा धुव्वा : दहिवडीत राष्ट्रवादीच्या देशमुखांची जादू चालली!

दहीवडी नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय : आमदार जयकुमार गोरे गटाचा पराभव

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : दहिवडी नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने अपक्ष उमेदवाराच्या साथीने नऊ जागा जिंकत सत्तांतर घडवले. आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) गटाच्या फक्त पाच जागा निवडून आल्याने आमदार गोरे गटाचा धुव्वा उडाला. एकसंघ व मजबूत प्रचार राष्ट्रवादीला विजयापर्यंत घेऊन गेला तर अंतर्गत लाथाळ्या, कुरघोड्या व सत्तेची मस्ती भाजपला नडली. (NCP's victory in Dahiwadi Nagar Panchayat: Defeat of MLA Jayakumar Gore's group)

दहिवडी नगरपंचयतीच्या निवडणुकीमध्ये १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ८ जागा मिळवल्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजेंद्र साळुंखे हे सर्वाधिक ५०० पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. भाजपने पाच जागा, तर शिवसेनेने तीन जागा जिंकल्या. भाजपच्या सत्ता काळात जनतेला पाच वर्षे पाणी पुरवठा व्यवस्थित करता आला नाही. आठ दिवसांतून येणारे गढूळ व दूषित पाणी, तुंबलेली गटारे याने जनता त्रस्त झाली होती. नळ कनेक्शन, घरांची नोंदणी असो की बांधकाम परवाना घेतानाही जनतेला प्रचंड त्रास देण्यात आला. भ्रष्टाचाराने बरबटलेले सत्ता जनतेने अखेर उलथवून टाकली. सत्तेची धुंदी, अरेरावी, आडवाआडवी याला जनता त्रासली होती. त्याचा परिणाम जनतेने मतदानातून दाखवला. मतदारांना गृहीत धरणे यामुळेच फक्त पाच जागांवर भाजपला समाधान मानावे लागले.

दुसरीकडे, प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने नियोजनबद्ध प्रचार करुन न येणाऱ्या जागाही मोठ्या फरकाने निवडून आणून चमत्कार केला. आठ उमेदवार विजयी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. ज्येष्ठ व तरुण एकत्र आल्यास काय घडू शकते, याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या विजयात आला. तर शेखर गोरे यांनीही ऐनवेळी निवडणुकीत एन्ट्री घेत रंगत आणली व शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी केले. प्रभाग पाचमधील शैलेंद्र खरात यांचा विजय, तर सिध्दार्थ गुंडगे आणि अजित पवार यांचा पराभव धक्कादायक ठरला. या सत्तांतराने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्यात उत्साहाचे वातावरण असून शहरातून गुलालाची उधळण करत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली.

दहीवडी नगरपंचायतीचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे : प्रभाग १- सुरेखा पखाले (शिवसेना), प्रभाग २- वर्षांराणी सावंत (राष्ट्रवादी), प्रभाग ३- विजया जाधव (शिवसेना), प्रभाग ४- महेश जाधव (राष्ट्रवादी), प्रभाग ५- शैलेंद्र खरात (शिवसेना), प्रभाग ६- धनाजी जाधव (भाजप), प्रभाग ७- उज्ज्वला पवार (भाजप), प्रभाग ८- मोनिका गुंडगे (राष्ट्रवादी), प्रभाग ९- नीलम जाधव (भाजप), प्रभाग १०- नीलिमा पोळ (राष्ट्रवादी), प्रभाग ११- राणी अवघडे (भाजप), प्रभाग १२- राजेंद्र साळूंखे (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष), प्रभाग १३- विशाल पोळ (राष्ट्रवादी), प्रभाग १४- सागर पोळ (राष्ट्रवादी), प्रभाग १५- रुपेश मोरे (भाजप), प्रभाग १६- सुरेंद्र मोरे (राष्ट्रवादी), प्रभाग १७- सुप्रिया जाधव (राष्ट्रवादी).

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT