Gokul Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul: गोकुळच्या ठरावावरून गावागावांत धुमशान! प्रतिनिधीपदासाठी दूध संस्थांमध्ये दोन गट आमनेसामने; एका सहीसाठी टोकाचा संघर्ष

Gokul Dairy Election, Kolhapur Village Politics, Gokul Resolution Dispute: गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राजकारण तापले असून, मतदानाचा ठराव कोणाच्या नावावर करायचा यावरून दूध संस्थांमधील सदस्यांमध्ये अंतर्गत वाद आणि गटबाजी उफाळली आहे.

Rahul Gadkar

Gokul Dairy Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल लागताच कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा पारा कमालीचा चढला आहे. निवडणुकीसाठी ठरावाच्या माध्यमातून निवडणाऱ्या अधिकृत सभासदांवरून आता ग्रामीण भागातील दूध संस्थामध्ये दोन गट पाहायला मिळत आहेत. सभासद प्रतिनिधी कोण द्यायचा यावरून सचिव आणि सदस्यांमध्ये खटके उडत आहेत. ठरावाच्या माध्यमातून मिळणारे टोकन आणि प्रत्यक्ष मतदाना दिवशी होणारा लाभ यावरून संस्थेच्या सदस्यामध्येचं प्रचंड चढाओढ लागली आहे.

विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) कार्यालयाकडून सभासद दूध संस्थांना ठरावाच्या प्रती टपालाद्वारे मिळण्यास सुरुवात झाली आहे. संस्थेचा अधिकृत ठराव धारक कोण असावा, ठराव कोणाच्या नावावर पाठवायचा, यावरून संचालक मंडळांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्या संदर्भातील जिल्ह्यातील ग्रामीण भागात संस्थांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. या ठरावांवरूनच आता गावागावांतील दूध संस्थांमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला असून अंतर्गत वाद उफाळून आले आहेत.

गोकुळच्या मागील निवडणुकीत मतदारांना मिळालेल्या सोयी-सुविधांची चर्चा अद्यापही ताजी असल्याने, यंदा प्रतिनिधी बनण्यासाठी इच्छुकांमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे. यासाठी संचालकांच्या गाठीभेटी, गुप्त बैठका आणि रणनीती आखली जात आहे. त्यामुळे भविष्यात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक वर्षे एकत्र काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये ठरावावरून दोन ते तीन गट पडले आहेत.

करवीर तालुक्यातील एका संस्थेत तर सचिव आणि पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद निर्माण झाले असून, अधिकृत पत्रव्यवहाराबाबत उलटसुलट दावे केले जात आहेत. दोघांमध्ये मोठे घामासन झाले आहे. काही ठिकाणी ठराव मंजुरीच्या बैठकीतील उपस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तर काही संस्था पदाधिकाऱ्यांनी इच्छुकांशी थेट संपर्क टाळण्यासाठी निबंधक कार्यालयात ठराव जमा करण्याचा पवित्रा घेतला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेमुळे जुन्या राजकीय समीकरणांना तडे जात असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांविषयीची नाराजी आणि जुने वाद पुन्हा समोर येत आहेत. एकंदरीत, गोकुळच्या निवडणुकीची अधिकृत रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच ठरावांच्या निमित्ताने गावागावांत राजकीय उकळी फुटली आहे. तज्ज्ञांच्या मते, याच प्राथमिक प्रक्रियेतून पुढील निवडणुकीतील मोठ्या समीकरणांची बीजे रोवली जात आहेत. त्यामुळे गोकुळचा हा 'प्रारंभिक अंक' आगामी काळात अधिक रंगतदार आणि संघर्षमय होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान ज्याच्या नावे ठराव केला जाणार आहे त्याच व्यक्तीबद्दल सदस्यांमध्ये नाराजी निर्माण झाली तर दुग्ध निबंधांकडे त्या संदर्भात तक्रारी येण्याची शक्यता आहे. अशा सभासदाच्या विरोधात संस्था अविश्वासाचा ठराव देखील दाखल करू शकते. निवडणुकीच्या निमित्ताने मिळणारे आर्थिक लाभ एकतर संस्थेला मिळावेत अन्यथा सर्वांना मिळावेत याच भूमिकेतून संस्थेचे सदस्य एका व्यक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात. मात्र व्यक्तीनेच शब्द फिरवले तर त्या संदर्भात तक्रार देखील दाखल होण्याची भीती व्यक्त केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT