Solapur, 26 September : संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ३५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. २००४ मध्ये २५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला होता. त्यावेळी राज्यात ९०.०३ टक्के पाऊस झाला होता. यंदाचा दुष्काळ ऐन पावसाळी हंगामातील सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्याची वेळ सरकारवर आली आहे, उन्हाळा जसाजसा जवळ येईल, तसतशी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांची यादीही वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदाचा दुष्काळ सर्वाधिक त्रासाची ठरण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांत एकूण ५८ तालुके येतात. या ५८ तालुक्यांपैकी यंदा पहिल्याच टप्प्यात तब्बल ३५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाली आहे. त्यामुळे यंदा एल निनोचा प्रभाव किती मोठा आहे, हे दिसून येते.
दरम्यान, यापूर्वी सरकारने २००४ मध्ये दुष्काळ जाहीर केला होता. त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील २५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला होता. यंदा मात्र दुष्काळी तालुक्यांची संख्या जादा असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आतापासूनच जाणवू लागली आहे.
मागील २००४ दुष्काळामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश होता. त्या दुष्काळातही सोलापूर जिल्ह्यात पावसाची तूट जवळपास ४० ते ५० टक्के इतकी होती. ती यंदाच्या दुष्काळातही आहे. सांगली जिल्ह्यातील सात तालुक्यांत मागील वेळी दुष्काळ होता. त्या वेळी जत, आटपाडी, आणि कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केपेक्षा कमी पाऊस होता. या वेळी तो केवळ चार तालुक्यांत जाहीर करण्यात आलेला आहे.
या वेळी सातारा जिल्ह्यातील ६ सहा तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असून मागील २००४ मध्ये केवळ माण आणि खटाव हे दोन तालुके दुष्काळी होती. त्यावेळी या दोन तालुक्यांत पावसाचा मोठा खंड पडला होता. यंदाच्या दुष्काळी तालुक्यांत सर्वाधिक पावसाचे म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर आणि खंडाळा या दोन तालुक्यांचाही समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत २००४ मध्ये दुष्काळ होता, बारामती, इंदापूर, आणि दौंड तालुक्यात खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. यंदा ८ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहेत. मात्र, यातही राजगड (वेल्हे) आणि भोर हे सर्वाधिक पावसाचे तालुके म्हणून ओळख असलेल्या दोन तालुक्यांचा समावेश आहे.
मागील २००४ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता किंवा दुष्काळी परिस्थिती नव्हती. यंदा मात्र कोल्हापूरमधील ६ तालुक्यांचा समावेश दुष्काळामध्ये आहे, यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यांचा समावेश आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचे तालुके म्हणून ओळख असलेल्या भागांतही दुष्काळी परिस्थिती ओढावली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील २०२६ मधील जिल्हानिहाय दुष्काळी तालुके
१) पुणे (०८)
भोर, राजगड (वेल्हे), खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर
२) सोलापूर (११)
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा
३) सांगली (०४)
मिरज, आटपाडी, जत, कवठेमहाकाळ
४) सातारा (०६)
सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर.
५) कोल्हापूर (०६)
पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड
पश्चिम महाराष्ट्रातील २००४ मधील जिल्हानिहाय दुष्काळी तालुके
सोलापूर (११)
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.
सांगली (०७)
जत, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, खानापूर (विटा), आटपाडी आणि कडेगाव.
पुणे (०५)
बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर आणि शिरूर
सातारा (०२)
माण आणि खटाव
कोल्हापूर (निरंक)
.........................
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.