MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosale Sakal Design
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीत परत जाणार का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : ''छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रमाणे सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली होती. त्यानुसार माझी सर्व पक्ष समभाव.. अशी भूमिका आहे,'' अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर तुम्ही राष्ट्रवादीत परत जाणार आहात का, या पत्रकारांच्या प्रश्नावर व्यक्त केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यातील शासकिय विश्रामगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सातारा पालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ४८.५० कोटींचे अनुदान राज्य शासनाने उपलब्ध करावे, अशी मागणी केली. या भेटीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटते, असे विचारले असता उदयनराजे म्हणाले, आपल्याकडे लोकशाही आहे. तुम्ही निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आहेत. राजेशाही असती तर मी उत्तर दिले असते. लोकप्रतिनिधींनी हा निर्णय का घेतला, कशासाठी घेतला. ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांनाच विचारा, असे त्यांनी सांगितले.

तुमचे वैयक्तिक मत काय आहे, यावर उदयनराजे म्हणाले, ''मी भाजपचा नेता म्हणून नव्हे तर देशाचा नागरीक म्हणून बोलत आहे. प्रत्येकाला आपले वैयक्तिक जीवन असते. त्या व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर कसे वागायचे हा निर्णय त्यांचा त्यांनी घ्यायचा असतो. वाईनची विक्री बंद करा की नको, याबाबत लोकांनी विचार करायला हवा. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, असे सांगत हेल्थ ईज वेल्थ...हे लक्षात ठेवले पाहिजे.''

सातारा जिल्ह्याच्या दुर्गम खोऱ्यात किरकोळ व्यक्ती ९० ते ११० वर्षांपर्यंत आयुष्य जगतात. त्यामुळे तुमच्या लाईफ स्टाईलवर सर्व काही अवलंबून असते. त्यामुळे लोकांनी ठरवायचे असते की आपल्या किती जागायचे आहे ते. त्यामुळे याबाबत लोकांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुम्ही राष्ट्रवादीत परत जाणार आहात का, या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ''छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पध्दतीने सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली होती. त्याप्रमाणे माझी सर्व पक्ष समभाव अशी भूमिका असेल,'' असे ते मिश्किलपणे म्हणाले. अजित दादांच्या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले, या महिनाअखेरीस निवडणूका लागणार आहेत. त्यामुळे हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकास कामांसंदर्भात आम्ही भेटलो आहे, आमच्या विकास कामांसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT