Maharashtra Kesari Tournament sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

maharashtra kesari : “एकच ‘महाराष्ट्र केसरी’ घ्या!” शिंदेंच्या पैलवानाचा सरकारला इशारा अन् 40 गदांचा डाव

Chandrahar Patil Warning to the state government : राज्याच्या कुस्ती परंपरेत दरवर्षी चार संघटनांतर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. यावरून हिंदकेसरींसह दिग्गज मल्लांनी नाराजी व्यक्त करत एकच ‘महाराष्ट्र केसरी’स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे.

Aslam Shanedivan

  1. राज्यात सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा एकापेक्षा जास्त संघटनांकडून वर्षात अनेकदा आयोजित केल्यामुळे स्थानिक क्रीडा वर्तुळात तक्रार व चिघळ निर्माण झाली आहे.

  2. खेळाडू आणि आयोजकांनी एकत्र येऊन एका केंद्रीय स्पर्धेच्या मागणीसाठी आठ दिवसाचा अल्टिमेटम शासनाला दिला असून उपोषण व गदा परत करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

  3. हा प्रश्न चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात गांभिर्याने मान्य करून ठोस निर्णय घेण्यास सांगण्यात आला आहे; नतर क्रीडा समुदाय मोठ्या आंदोलनाच्या मार्गावर जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Sangli News : राज्यात मानाच्या मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा खेळखंडोबा सुरु आहे. एकाच वर्षी चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धांचे विविध संघटनांतर्फे आयोजन केले जात आहे. राज्यात एकाच मध्यवर्ती संघटनेतर्फे वर्षातून एकदाच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, अशी मागणी हिंदकेसरी दीनानाथसिंह, हिंदकेसरी संतोष वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी येथे आज पत्रकार बैठकीत केली. या मागणीचा चालू अधिवेशनात गांभिर्याने विचार व्हावा, अन्यथा शासनाला गदा परत देऊन आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

हिंदकेसरी दीनानाथसिंह म्हणाले, राज्याच्या कुस्ती परंपरेत दरवर्षी चार संघटनांतर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा नवा पायंडा पाडला जात आहे. तो घातक असून त्यातून स्पर्धेची शान हरवली जात आहे. गेल्या ६५ वर्षांपासून या स्पर्धा सुरु असून अलीकडे काही वर्षात कुस्ती संघटनांच्या राजकारणामुळे हे घडत आहे. राजकारणविरहित असणारी कुस्ती वर्षातून चार स्पर्धांमुळे चितपट होत आहे. त्यामुळे राज्याच्या कुस्तीतील खरा बाजीगर कोण? असा प्रश्न शौकिनांसमोर येत. वारंवार स्पर्धांमुळे पैलवानांची गळेकापू स्पर्धा निर्माण होत आहे. हे धोकादायक ठरत आहे.

हिंदकेसरी संतोष वेताळ म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला इतिहास आहे. या इतिहासाला राजकारणाचा डाग लागत आहे. संघटनांच्या ईर्षेपोटी होणाऱ्या स्पर्धा कितपत योग्य? याचा विचार व्हायला हवा. वर्षभर जोमात तयारी करुन पैलवान या स्पर्धेचा किताब मिळवण्‍यासाठी धडपडत असतात. मात्र चार-चार स्पर्धांमुळे प्रत्येकवेळी नवा पैलवान त्या पदाचा मानकरी होतो. एकाच वर्षात चार-चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुस्तीसारख्या मर्दानी खेळासाठी अयोग्य गोष्ट आहे.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले, वर्षातून एकच केसरी स्पर्धा व्हावी, या मागणीसाठी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. मुख्यमंत्र्यांसह क्रीडा मंत्र्यांनाही लेखी निवेदन दिले. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रकार झाला. आता या मागणीसाठी ‘आर या पार’ लढाईला सुरुवात झालेली आहे. एकच स्पर्धा व्हावी, या मागणीसाठी आम्ही शासनाला जाब विचारणार आहोत. सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच याबाबत निर्णय व्हावा. याबाबत आठ दिवसाचा अल्टिमेटम शासनाला देत आहोत. अन्यथा आझाद मैदानावर आम्हाला मिळालेल्या गदेसह उपोषण करुन त्या गदा शासनाकडे सन्मानपूर्वक परत करण्याची तयारी आहे.

महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम म्हणाले, आमदारांना पगारवाढ किंवा निवृत्ती वेतनाचा निर्णय घेताना सर्वानुमते निर्णय घेतला जातो. तसा निर्णय महाराष्ट्र केसरी किंवा हिंदकेसरी विजेत्यांच्या मानधन वाढीबाबत होत नाही, हे दुर्देव. पैलवानाइतके कष्ट आमदारांना निश्चितच नसतात. याबाबत शासनाने निर्णय घ्यावा. वृद्धापकाळात किमान गरजांची सोय व्हावी इतकी तरी पेन्शन शासनाने देण्याची गरज आहे. महान महाराष्ट्र केसरी विजय पाटील म्हणाले, वर्षातून एकदा होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जगात सर्वाधिक शौकिन उपस्थित असतात. चार स्पर्धांमुळे विजेता अस्सल पैलवान कोण? याचे गणितच लागत नाही.

तर ‘महाराष्ट्र केसरी’ला एक कोटी बक्षिस

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणाले, शासनाने एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याबाबत निर्णय याच अधिवेशनात घेतल्यास ती सांगलीत घेण्याचा आग्रह धरू. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी काय कष्ट घ्यावे लागतात, याची मला जाणीव आहे. विजेत्याला गदा, किताब व सन्‍मानापलीकडे काही मिळत नाही. एका स्पर्धेनंतर त्याची आयुष्यभर हेळसांड सुरु होते. त्यासाठी वैयक्तिक आयोजन करुन महाराष्ट्र केसरी विजेत्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा त्यांनी केली.

४० महाराष्ट्र केसरी १० हिंदकेसरींचा पाठिंबा

राज्‍यात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, या मागणीला राज्यातील हयात असणारे ४० महाराष्ट्र केसरी व १० हिंदकेसरी पैलवानांचा एकमुखी पाठिंबा असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. कुस्ती क्षेत्रासाठी लांच्छनास्पद असणारी चार-चार केसरी स्पर्धा रद्द करुन वर्षातून एकच स्पर्धा होण्याची मागणी राज्यभरातून होत आहे. त्या मागणीचा शासनाने गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली.

FAQs :

1. मागणी नेमकी काय आहे?
खेळाडू व आयोजकांचा दाद आहे की वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा केंद्रिय संघटनेने आयोजित करावी, चार-चार स्पर्धा अनेक संघटनांकडून न होवोत.

2. मागणी करणारे प्रमुख नेते कोण आहेत?
ही मागणी हिंदकेसरी नेते आणि महाराष्ट्र केसरी व डबल महाराष्ट्र केसरी पदवीधरांनी पत्रकार बैठकीत मांडली — त्यात प्रमुख हवाले होते.

3. जर मागणी मान्य झाली नाही तर काय करणार?
आठ दिवसाच्या अल्टिमेटम नंतर आयोजक आझाद मैदानात उपोषण करुन गदा परत करण्याचे जाहीर इशारे देत आहेत.

4. हे प्रकरण कधी निर्णयाला येऊ शकते?
हेल्फरच्या मागणीनुसार चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गंभीरपणे विचारावा अशी मागणी करण्यात आली आहे.

5. स्पर्धा एकत्र करावयाची का आहे? कोणते फायदे असतील?
एक केंद्रीकृत स्पर्धा झाल्यास संघटना समन्वय साधू शकतील, पुरस्कार व गुणवत्ता नियंत्रण सुसंगत राहील, आणि प्रतिस्पर्ध्यांना स्पष्ट मार्गदर्शन मिळेल असे आयोजकांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT