Dilip Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Dcc Bank : एकेकाळच्या कट्टर समर्थकानेच अडवली उत्तर सोलापूरच्या ‘मालका’ची DCC बॅंकेतील बिनविरोधची वाट!

Dilip Mane News : सोलापूर जिल्हा बँकेच्या उत्तर सोलापूर सोसायटी मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केला. दिलीप माने आणि पुत्र पृथ्वीराज मानेही रिंगणात आहेत. त्यामुळे माने यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता सध्या लांबणीवर पडली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 31 October (संदीप गायकवाड) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उत्तर सोलापूर तालुका सोसायटी मतदारसंघातून मार्डीचे बाबासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून बँकेचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने आणि त्यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज माने यांनीही अर्ज दाखल केले आहेत. गतवर्षीपर्यंत माने यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात परिचित असलेले पाटील यांनी अर्ज भरल्याने उत्तर सोलापूरच्या दिलीपमालकांची बिनविरोध होण्याची शक्यता तूर्तास लांबणीवर पडली आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालकांच्या १९ जागांसाठी २३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शुक्रवारी अंतिम दिवस होता. बॅंकेच्या सोसायटी गटातून उत्तर सोलापूर तालुका मतदारसंघातून एकूण १० अर्ज दाखल झाले आहेत.

त्यामध्ये दिलीप माने यांचे चार, त्यांचे पुत्र डॉ. पृथ्वीराज माने यांचे तीन, भाचे धनंजय भोसले यांचे दोन, तर मार्डी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांचा एक अर्ज आहे. पाटील यांच्या अर्जावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बळिराम साठे सूचक, तर सरोजा सिद्धराम चाकोते ह्या अनुमोदक आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील सहकाराच्या राजकारणावर आजवर दिलीप माने यांची एकहाती पकड राहिलेली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीतही त्यांचाच शब्द अंतिम राहील, असे चित्र होते. मात्र, बाबासाहेब पाटील यांच्या उमेदवारीमुळे माने यांची बिनविरोध निवड रोखण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे.

पाटील हे गेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत माने यांचे कट्टर समर्थक म्हणून तालुक्यात ओळखले जात होते. गेल्या २५ वर्षांपासून ते मार्डी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती होत्या, तर त्यांचे बंधू बाळासाहेब पाटील यांना माजी आमदार दिलीप माने यांनी बाजार समितीच्या संचालकपदाची संधी दिली होती.

माघार की उमेदवारी कायम राहणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मार्डीतील गावपातळीवरील राजकारणातून दुखावले गेल्याने बाबासाहेब पाटील यांनी साठे गटाची साथ धरली. पाटील यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून माने यांना रोखण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत पाटील आपली उमेदवारी कायम ठेवतात की माघार घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT