ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक ताण वाढल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
सुसाईड नोटमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याचे आणि नैराश्य वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Kolhapur News: ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने कोरोची (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. आदित्य मिलिंद कोळी (वय २४, रा. एस.टी. स्टँड मागे, कोरोची) असे त्याचे नाव आहे. त्याने गेमिंगमुळे आलेल्या कर्जबाजारीपणातून आणि नैराश्यातून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट मिळून आली आहे.
शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, मृताचा चुलत भाऊ भालचंद्र कोळी यांने वर्दी दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदित्यने शनिवारी (ता. १८) सायंकाळी सुमारे पावणेपाचपूर्वी घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत छताला असलेल्या लोखंडी ॲंगलला दोरीने गळफास लावून घेतला. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला खाली उतरविण्यात आले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली. आदित्यने चिठ्ठीत ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याचे व त्यात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याने मानसिक ताण वाढल्याचे नमूद केले आहे. या आर्थिक नुकसानीतून बाहेर पडता न आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
वर्षभरापूर्वी वडिलांचे निधन
आदित्यच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याच्या काळातच तो ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात अडकला गेला.
मोबाईलही विकला
पाच हजारांपासून सुरू झालेला ऑनलाईन गेमिंगचा नाद पुढे ४०-८० हजार करत लाखोंच्या घरात गेला. सततच्या आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी त्याने ३५ हजार रुपयांना स्वतःचा मोबाईलही विकला. कर्जाचे ओझे व आर्थिक कोंडीमुळे तो नैराश्यात गेला. या मानसिक तणावातूनच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा स्पष्ट उल्लेख आदित्यच्या सुसाईड नोटमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
1. ही घटना कशामुळे घडली?
ऑनलाईन गेमिंगमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आणि मानसिक ताणामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
2. सुसाईड नोटमध्ये काय नमूद होते?
गेमिंगच्या व्यसनामुळे पैसे गमावल्याने नैराश्य वाढल्याचे नमूद होते.
3. या घटनेतून काय शिकायला मिळते?
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन टाळणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
4. गेमिंग व्यसन टाळण्यासाठी काय करावे?
वेळेचे नियोजन, आर्थिक मर्यादा आणि कुटुंबाशी संवाद ठेवणे गरजेचे आहे.
5. अशा परिस्थितीत मदत कुठे मिळू शकते?
मानसिक आरोग्य तज्ञ, समुपदेशक आणि हेल्पलाईन सेवांचा आधार घेता येतो.