Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नवा-जुना बघणार नाही; निवडून येणाऱ्यालाच राष्ट्रवादीची उमेदवारी

तांत्रिक कारणामुळे काही प्रवेश रखडले आहेत. ते येत्या काळात होतील. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील अनेक दिग्गज मंडळी येत्या काळात राष्ट्रवादीसोबत दिसतील

प्रमोद बोडके

सोलापूर : राष्ट्रवादीत (ncp) आता नवा आणि जुना हा विषय चालणार नाही. पक्षवाढीसाठी नव्या कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेतले आहे. आगामी निवडणुकांमध्ये नवा आणि जुना असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही. ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच उमेदवारीची संधी दिली जाईल. तांत्रिक कारणामुळे काही प्रवेश रखडले आहेत. ते येत्या काळात होतील. सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील अनेक दिग्गज मंडळी येत्या काळात राष्ट्रवादीसोबत दिसतील, अशी माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली. (Only those who get elected will be given NCP candidature in Solapur Corporation election: Jayant Patil)

राष्ट्रवादीच्या परिवार संवाद कार्यक्रमातून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी हेरिटेज लॉनमध्ये सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, माजी महापौर महेश कोठे, नगरसेवक तौफिक शेख, जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, कार्याध्यक्ष संतोष पवार आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा सोलापूर जिल्हा आणि शहर आहे. पवार यांच्यावर प्रेम करतात; परंतु राष्ट्रवादीला महापालिकेत सत्ता का मिळत नाही?, सोलापूर शहरात राष्ट्रवादीचा आमदार का होत नाही? या प्रश्‍नाचे उत्तर आम्ही शोधत असताना आम्हाला महेश कोठे हे उत्तर मिळाले असल्याचेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या कामावर सोलापूरकरांची नाराजी आहे. भाजपने दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता झाली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीकडून सोलापूरकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आपल्यात मतभेद असतील तर मतभेद दाखवायचे नाहीत, महापालिका निवडणुकीतून स्वत:चा गट वाढविण्यापेक्षा निवडून येणाऱ्या व्यक्तीला संधी देण्यासाठी आग्रह धरत बेरजेचे राजकारण करा, अशी सूचनाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.

महापालिका निवडणूक होईपर्यंत मी स्वत: तीन ते चार वेळा सोलापूरचा दौरा करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सोलापूर शहर व जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद यासह आगामी निवडणुकांमध्ये पालकमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

पटत नसेल तर पक्षातून बाहेर जाऊन विरोध करा

समोरच्याच्या मनातले ओळखणाऱ्या महान ज्योतिषाला खोटे ठरविण्यासाठी गेलेल्या व्यक्‍तींची बोधकथा माजी महापौर महेश कोठे यांनी सांगत भाषणाची सुरुवात केली. आपली माणसे आपल्याला संपवितात. आपल्याला संपविण्याची ताकद विरोधकांमध्ये नाही. एकाच पक्षात राहून कोणीही गद्दारी करु नये, पटत नसेल तर त्यांनी पक्षातून बाहेर जाऊन विरोध करावा अशी अपेक्षा कोठे यांनी व्यक्त केली. भाजप हा कार्यकर्ता ओरिएन्ट पक्ष आहे तर राष्ट्रवादी हा नेता ओरिएन्ट पक्ष असल्याचेही सांगितले.

सोलापूरचे नेते चांगले;पण...

नवा-जुना वाद, गट तट हे सर्व सोडून द्या. पुढे जाणाऱ्याचे पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून द्या अशी अपेक्षा पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केली. सोलापुरात राष्ट्रवादीचे नेते चांगले आहेत; परंतु त्यांच्यासोबत असलेले काही जण लावालाव्या करतात. नुसत्या तक्रारी करतात अशा व्यक्तींपासून सावध राहिले पाहिजे, असा सल्लाही पालकमंत्री भरणे यांनी दिला. लावालाव्या करण्यात आणि तक्रारी करण्यात काहीच नसते, आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा अशी अपेक्षाही पालकमंत्री भरणे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT