Satara News: Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News: विरोधकांना राजकारणासाठी बाजार समितीची सत्ता हवीये; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Karad Bajar Samiti Election | मी सहकाराच्या निवडणुकीत सहसा भाग घेत नाही. यावेळी मी जाणीवपुर्वक भाग घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

Satara Politics : शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती काम करेल, यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती. मात्र काही मंडळी सहकारी संस्थेच्या माध्यमातून निवडणुकीत येऊन त्याचा राजकारणासाठी उपयोग करण्यासाठी निवडणुकीत उतरले आहेत. ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी वाचली पाहिजे, या भावनेतून मी निवडणुकीत भाग घेतला आहे. या निवडणुकीतील विजय विलासकाकांना दिलेली श्रध्दांजली ठरेल, असे भावनिक उद्गार आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी आज काँग्रेसच्या मेळाव्यात काढले.

बाजार समितीच्या निवडणुकीतील आमदार चव्हाण व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या नेतृत्वाखालील (स्व.) लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. दरम्यान, यावेळी बाजार समितीवर बिनविरोध निवडून आलेल्या गणपत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

आमदार चव्हाण म्हणाले,‘‘ कऱ्हाडची बाजार समिती स्वातंत्र्यापुर्वी स्थापन झाली. ही राज्यातील अग्रगण्य असणारी भूषण ठरावी, अशी बाजार समिती आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह काम बाजार समितीमार्फत सुरु आहे. मी सहकाराच्या निवडणुकीत सहसा भाग घेत नाही. यावेळी मी जाणीवपुर्वक भाग घेतला आहे. सहकारी क्षेत्रात अपप्रवृत्ती येऊ लागली आहे. ही बाजार समिती विलासकाकांनी अनेक वर्षे सक्षमपणे सुरु ठेवली आहे. बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी राहिली पाहिजे. तेथील राजकीय आक्रमण थांबले पाहिजे यासाठी निवडणुकीत मी भाग घेतला आहे.

अॅड. उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांच्या पश्चात ही निवडणूक होत असून, संघटनेच्या माध्यमातून आपण सभासदांसमोर जाणार आहोत. समविचारी लोकांची मोट बांधून ही निवडणूक लढवली जाईल. व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रस्थापित लोकं सर्वसामान्यांच्या हक्कावर टाच आणत आहेत. समाजावरील अतिक्रमण थोपवणे गरजेचे आहे. तसेच पुरोगामी विचारांची पाठराखण व्हावी, या हेतूने मी आणि पृथ्वीराजबाबा विशेष भूमिका घेऊन एकत्र आलो आहोत.

मध्यंतरी सत्तेत आलेल्या मंडळींनी बाजार समितीवर सुमारे पन्नास कोटी रुपये कर्ज केले. पण काकांनी पुन्हा बाजार समितीची सत्ता घेतली. आणि आज हीच बाजार समिती आता तीन कोटी रुपयांची ठेव बाळगून आहे. आता त्याच मंडळींना सत्ता हवी आहे. विरोधी मंडळींनी त्यांचा मूळ विचार बाजूला ठेवला आहे. विरोधकांना लोकांना गुलाम करून स्वतःची सत्ता राखण्यासाठी बाजार समितीची सत्ता हवी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT