Pune, 11 October : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस, युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, तर माजी आमदार संजय जगताप आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल या तिरंगी लढतीमुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. कारखान्यासाठी चुरशीने आज (ता.11 ऑक्टोबर) 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. मतपेटीत तीनही पॅनेलच्या 83 उमेदवारांचे भवितव्य बंद झाले आहे. बारामतीत उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात सर्वाधिक उसदर देणारा कारखाना श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात परिचित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर कारखान्याची पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.
निवडणुकीत प्रथमच तीन पॅनेल उतरले असून रविवारी ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. कारखान्याच्या सत्तेसाठी तीनही पॅनेलनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणुकीत ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवारी (ता. १२) होणाऱ्या मतमोजणीकडे सभासदांसह राज्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वरच्या मतदान प्रक्रियेला रविवारी सकाळी आठपासून सुरुवात झाली. दिवसभर अनेक मतदान केंद्रांवर सभासदांची गर्दी पाहायला मिळाली. मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान करण्याची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याने मतदारांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. मतदानासाठी लागणारा वेळ पाहता निर्धारित वेळेत प्रक्रिया पूर्ण होईल का, अशी चर्चा मतदान केंद्रांच्या परिसरात सुरू होती.
सायंकाळी पाच वाजता मतदानाची निर्धारित वेळ संपली. मात्र, त्या वेळीही मतदान केंद्रांवर उपस्थित सभासदांना मतदान करता यावे, यासाठी प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती. मतपत्रिकेवर मतदान करताना प्रत्येक उमेदवाराच्या चिन्हावर शिक्का मारण्यासाठी वेळ लागत असल्याने काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली. असे असले तरी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
निवडणुकीत तीन पॅनेलचे एकूण ८३ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे प्रत्येक गटातील लढतीकडे सभासदांचे लक्ष लागले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून पॅनेलप्रमुख, उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मतदानाच्या दिवशीही मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या सभासदांना मतदानासाठी गावात आणण्यावरही उमेदवारांनी भर दिला.
कारखान्याचा कारभार, ऊसदर, सभासदांचे हित आणि आगामी काळातील आव्हाने या मुद्द्यांभोवती निवडणुकीची चर्चा रंगली होती. तिन्ही पॅनेलनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मतदानाच्या कौलाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सोमवारी होणाऱ्या मतमोजणीतून कारखान्याच्या सत्तेचा फैसला होणार आहे. सभासदांनी कोणत्या पॅनेलच्या बाजूने कौल दिला, हे निकालानंतर स्पष्ट होईल. या निकालाचे पडसाद बारामती तालुक्याच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात उमटणार असल्याने सभासद, कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.