रविकांत बेलोशे
Pachgani News : पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी सत्तेचा ‘उलटफेर’ पाहायला मिळाला. अटीतटीच्या व श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सत्तासंघर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. अवघ्या दोन मतांच्या निसटत्या फरकाने दिलीप बगाडे हे नगराध्यक्षपदावर विराजमान झाले. त्यांच्या विजयाने बगाडे हे पाचगणीच्या राजकारणातील ‘गेमचेंजर’ ठरले. गेली अनेक वर्षे या पर्यटनस्थळावर वर्चस्व गाजवणाऱ्या लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या सत्तेला राष्ट्रवादीला सुरुंग लावण्यात अखेर यश आले. दरम्यान, कऱ्हाडकर यांना भाजपकडून रसद पुरवूनही त्यांचा डाव फुका गेला.
सुरुवातीपासून माजी नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी या निवडणुकीत विजयासाठी आत्मविश्वास दाखवला होता. त्यांना भाजपने पडद्यामागून मोठी रसद पुरवली. मंत्री जयकुमार गोरे यांनी पाचगणीत तळ ठोकून विजयाची व्यूहरचना आखली होती. संतोष कांबळे यांच्यासाठी भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. कऱ्हाडकर आणि भाजप-शिवसेना (एकनाथ शिंदे) यांची युती, त्यात कऱ्हाडकर यांची प्रचारातील अचूक पकड, यामुळे कांबळे यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात माप टाकले.
एकीकडे सत्ताधारी गट आक्रमक प्रचार करत असताना राष्ट्रवादीचे नेते, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी शांत, संयमी पद्धतीने मोर्चेबांधणी केली. मकरंद आबांनी मंत्रिपदाच्या काळात शहरासाठी दिलेला विकासनिधी आणि राजेंद्र राजपुरे यांचा स्थानिक कार्यकर्त्यांशी असलेला दांडगा संपर्क राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला. येथील राजकारणात पक्षापेक्षा अपक्षांचा बाजार नेहमीच तेजीत असतो. मात्र, यावेळी राष्ट्रवादीने पक्षीय ताकद आणि व्यक्तिगत जनसंपर्क यांचा सुरेख संगम साधला.
जिल्हा बँकेचे संचालक राजपुरे यांनी माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांच्या साथीने पाचगणीत राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट करण्याचे काम केले आहे. राजकारणातील ‘डावपेच’ आणि ‘गणिते’ जुळवण्यात राजपुरे यांचा हातखंडा आहे. यावेळी त्यांनी अगदी सूक्ष्म नियोजन करत विजयासाठी लागणारी मते पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादीला सत्तेच्या सिंहासनावर बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यावर अनेक प्रभागांत अंतर्गत स्पर्धा सुरू होती. अशा स्थितीत दिलीपभाऊंची काहीशी कोंडी होत होती. मात्र, त्यांनी संयम ढळू दिला नाही. जनतेतील त्यांची ‘भाऊ’ ही प्रतिमा आणि नेत्यांचे खंबीर मार्गदर्शन यांच्या जोरावर त्यांनी कऱ्हाडकर गटाचा चंग उधळून लावला. शेवटच्या क्षणी दोन मतांची सरशी करत त्यांनी विजयश्री खेचून आणली.
या निवडणुकीत भाजपने (BJP) स्वबळावर चार उमेदवार चिन्हावर उभे केले होते. त्यातील दोन उमेदवारांचा कमी मतांच्या फरकाने पराभव झाला. वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी अधिक ताकद लावली असती, तर भाजपला खाते उघडता आले असते. दुसरीकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मात्र ‘नामधारी’ ठरले. त्यांना दोनअंकी मतदान घेतानाही कसरत करावी लागली.
विजयाचा गुलाल उधळला असला, तरी राष्ट्रवादीसमोर (NCP) आता पाचगणीच्या विकासाचा डोंगर उभा आहे. पर्यटन शहराचा रखडलेला विकास, पिण्याचे पाणी, रस्ते आणि पर्यटकांच्या सुविधा यांचा अनुशेष भरून काढण्याचे आव्हान नूतन नगराध्यक्ष दिलीप बगाडे आणि त्यांच्या टीमसमोर असेल, तर दुसरीकडे पराभवामुळे लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्यावर मात्र आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.