Satara Result : सातारा जिल्ह्यात भाजपचा दबदबा : रामराजेंचा बालेकिल्ला उद्ध्वस्त, मकरंदआबांनाही सलग दुसऱ्यांदा धक्का

Nagar Parishad Election Result 2025 : साताऱ्यासह 06 नगरपालिका आणि मेढा नगरपंचायतीत भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला. निकालानंतर मतमोजणी केंद्रांबाहेर समर्थकांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष केला.
Satara Nagar Parishad Result 2025
Satara Nagar Parishad Result 2025Sarkarnama
Published on
Updated on
  1. साताऱ्यासह नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल उधळण व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.

  2. सातारा, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, वाई, मलकापूर आणि मेढा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले, तर कऱ्हाड, महाबळेश्वर व पाचगणीमध्ये इतर पक्षांना यश मिळाले.

  3. अनेक ठिकाणी दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर भाजप व मित्रपक्षांच्या नेत्यांनी विविध पालिकांवर आपली सत्ता प्रस्थापित केली.

Satara, 21 December : साताऱ्यासह नऊ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीच्‍या निकाल स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर प्रत्‍येक मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्‍या विजयी उमेदवारांच्‍या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत जल्‍लोष केला. सातारा, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर, वाई या नगरपालिका, तर मेढा नगरपंचायतींमध्ये भाजपचा नगराध्यक्ष विजयी झाला आहे.

सातारा, वाई, मलकापूर, कऱ्हाड, फलटण, पाचगणी, महाबळेश्‍‍वर, रहिमतपूर, म्‍हसवड या पालिका तर मेढा या नगरपंचायतीच्‍या निवडणुकीसाठीच्‍या प्रक्रियेदरम्‍यान झालेल्‍या मोठ्या नेत्‍यांच्‍या सभांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. त्यानंतर झालेल्‍या मतदान प्रक्रियेनंतर प्रत्‍येकजण आपापल्‍या परीने विजयाचे दावे प्रतिदावे करत होता. तांत्रिक कारणांमुळे मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडल्‍याने उमेदवारांसह समर्थकांचा जीव टांगणीला लागला होता. मतमोजणीची तारीख जवळ ये लागल्‍यानंतर पुन्‍हा एकदा उमेदवारांसह समर्थकांची घालमेल वाढली होती.

रविवारी सकाळी मतमोजणीस सुरुवात झाली. सकाळपासूनच अनेकांनी विजयी मिरवणुकीची तयारी सुरु केली होती. भलेमोठे हार, सजवलेली वाहने तसेच वाद्य आणि ध्‍वनीवर्धक यंत्रणांची जुळणी अनेकांनी केली होती. सकाळी ११ नंतर सर्वच ठिकाणी विजयी उमेदवार आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी गुलालाची उधळण करत मिरवणुका काढण्‍यास सुरुवात केली. या मिरवणुकांमुळे साताऱ्यासह इतर ठिकाणचे वातावरण गुलालमय झाले होते. दुपारी एकपर्यंत सर्वच ठिकाणच्‍या नगराध्‍यक्षपदासह नगरसेवकपदांचे निकाल जाहीर झाल्‍यानंतर फटाक्‍यांच्‍या आतीषबाजीसह गुलालाच्‍या उधळणीस उधाण आले होते.

नूतन नगराध्यक्ष

भाजपचे नगराध्यक्ष सातारा : अमोल मोहिते, फलटण : समशेरसिंह निंबाळकर, रहिमतपूर- वैशाली माने, म्हसवड- तेजस सोनावले, वाई- अनिल सावंत, मेढा नगरपंचायत- रूपाली वारागडे, तर कऱ्हाड येथे शिवसेना पुरस्कृत राजेंद्रसिंह यादव, महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे सुनील शिंदे आणि पाचगणीमध्ये दिलीप बगाडे हे नगराध्यक्षपदी निवडून आले आहेत.

Satara Nagar Parishad Result 2025
Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदे भाजपलाही नडले; कुंभमेळा नगरीतच ठरले नंबर वन, महाविकास आघाडीचा सुपडा साफ!

दिग्गजांना धोबीपछाड

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे सुपुत्र अनिकेतराजे यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी धोबीपछाड दिली आहे. भाजपने फलटण नगरपालिकेतील रामराजेंची 30 वर्षांची सत्ता उलथवली आहे.

मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगराध्यक्षपदाचे उमेदवार नितीन कदम यांचा पराभव झाला. इथे भाजपचे अनिल सावंत विजयी झाले. गतवेळीही भाजपच्या प्रतिभा शिंदे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या होत्या.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील कऱ्हाड शहरात विनायक पावसकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सुनील माने यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपच्या आमदार मनोज घोरपडे, चित्रलेखा माने-कदम यांनी सुरूंग लावला.

या मातब्बरांनी मिळविली सत्ता

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सातारा व मेढ्यात सरशी झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हसवडमध्ये एकहाती सत्ता काबीज करत लक्ष घातलेल्या फलटण आणि वाई पालिकामध्येही आपल्या पक्षाचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत.

पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर, पाचगणी येथील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले. भाजपचे डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर, आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली रहिमतपूर विजयश्री खेचून आणली आहे.

Satara Nagar Parishad Result 2025
Beed Election 2025: बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दोन भावांचं पार्सल पॅक! सर्वाधिक जागा जिंकत भाजप, शरद पवारांच्या पक्षालाही धक्का
  1. भाजपला कोणत्या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपद मिळाले? – सातारा, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, वाई, मलकापूर आणि मेढा नगरपंचायतीत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले.

  2. कऱ्हाड, महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये कोण जिंकले? – कऱ्हाडमध्ये शिवसेना पुरस्कृत, महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी, तर पाचगणीमध्ये अपक्ष उमेदवार विजयी झाले.

  3. या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना काय फटका बसला? – काही ठिकाणी प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व मोडीत काढत प्रतिस्पर्ध्यांनी विजय मिळवला.

  4. या निकालामुळे राजकीय वातावरणावर काय परिणाम झाला? – जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढले असून विजयानंतर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com