Satara Political News : सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात काहीना काही हालचाली सुरू झाल्या आहेत. यावेळेस विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बदल घडवून आणायचा निश्चय केला आहे.
'फलटणमध्ये आता आमदार बदलायचाय...' अशी टॅगलाईन सोशन मीडियावर फिरू लागली आहे. ही टॅगलाईन घेऊन उद्धव ठाकरे गट या जागेवर उमेदवार देण्याची तयारी करत आहे. त्यामुळे ही टॅगलाईन अजित पवार गटाचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सातारा जिल्ह्यात सातारा व माढा हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सातारा लोकसभेची जागा महाविकास आघाडीने गमवली आहे. तर माढामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे खासदार झाले. त्यांनी भाजपचे बलाढ्य नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांचा पराभव केला.
त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांना विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची छुपी तर त्यांच्या कुटुंब व राजे गटाची पूर्ण ताकत मिळाली. त्यामुळे रामराजेंनी निवडणुकीपूर्वी स्वीकारलेले आव्हान पेलत रणजितसिंह निंबाळकरांचा पराभवात मोठा वाटा उचलला.
आता फलटण मध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. महायुतीत असूनही रामराजेंनी विरोधात काम केल्यामुळे त्यांना अजित पवार Ajit Pawar गटातून बाहेर काढावे, अशी मागणी मध्यंतरी जोर धरली होती. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजे गट अजित पवार गटासोबत राहणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार याची उत्सुकता आहे. नुकतीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मुंबईत बैठक झाली. यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवाची कारणमिमांसाही झाली. या बैठकीस माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांची भूमिका सध्यातरी गुलदस्त्यात आहे.
फलटण विधानसभा मतदारसंघात सध्या 'आता आमदार बदलायचाय' अशी टॅगलाईन सोशल मीडियावर फिरू लागली आहे. यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उडी घेतली आहे. याबाबत उद्धव ठाकरे गट शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे यांचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
त्यांनी म्हटले की, फलटणमध्ये गेली 15 वर्षे एकाच पक्षाचा आमदार आहे. शेजारीच बारामती तालुका असून केवळ बॉर्डरच मधे आहे. त्यामुळे बारामतीचा विकास बघा आणि फलटणचे मागासलेपण पहायला मिळते. यातूनच जनतेची मागणी आता पुढे येत असून फलटणमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. त्यानुसार आम्ही महाविकास आघाडीचा आमदार फलटणमध्ये निवडून आणण्याचे निश्चित केले आहे. यावेळेस आमदार बदलायचाय ही जनतेची मागणी घेऊन आम्ही फिरत आहोत.
हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याचा आहे. 2004 व 2009 मध्ये येथून बाबूराव माने यांनी निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये डॉ. नंदकुमार तासगावकर यांनी निवडणूक लढली होती. 2019 मध्ये ही जागा महायुतीत रयत क्रांती संघटनेला सोडायचे ठरले. त्यानुसार त्यांनी ही निवडणूक कमळ चिन्हावर लढली.
मूळात हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिलेला आहे. त्यामुळे यावेळेस महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे गट या जागेची मागणी करणार आहे. आमच्या शिवसेनेकडे तीन चार जण इच्छुक असून ज्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण आहे, अशांची नावे सूचविणार आहोत. येथून लोकांची समस्या ऐकणारा आणि ती समस्या सोडविणारा आमदार हवा आहे, त्यामुळे आम्ही शिवसेनेचा उमेदवार येथून देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.