Ahmednagar News : वंजारी समाजाचे प्राबल्य असलेल्या पाथर्डी-शेवगाव मतदारसंघातून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी 2024 ची विधानसभा लढवावी, यासाठी मतदारसंघातील मुंडे समर्थक उघडपणे पुढे आल्याने विद्यमान आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या पुढे एक मोठे आव्हान उभे राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे आता मोठे राजकीय नाट्य निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)
मुंडे परिवाराचे आणि पाथर्डीचे एक वेगळे भावनिक नाते आहे. भगवानबाबा गड आणि दसरा मेळावा हे समीकरण कित्येक वर्षं गोपीनाथ मुंडेंनी जपले. आजही घराघरात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे फोटो देव्हाऱ्यात त्यांचे हजारो समर्थक ठेवतात. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर हेच प्रेम पंकजा मुंडे यांना मिळताना दिसत आले.
नुकत्याच जाहीर झालेल्या भाजप जिल्हा कार्यकारिणीमुळे आमदार मोनिका राजळे आणि मुंडे समर्थक यांच्यात सुप्त संघर्ष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मुंडे समर्थकांच्या जुन्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला राजळेंकडून आलेली स्थगिती हा कळीचा मुद्दा ठरला आहे. याचेच पडसाद आधी जिल्हा अध्यक्षांना भेटून सामूहिक राजीनाम्याचा इशारा आणि त्यानंतर थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोर नाराजी व्यक्त करत झालेली घोषणाबाजी, यातून शेवगाव-पाथर्डीमधील पक्षांतर्गत दुफळी समोर आली आहे.
आता यात थेटपणे माजी पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड आणि माजी जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व ज्येष्ठ नेते बाळासाहेब सोनवणे यांनी उघडपणे पदाधिकारी निवडीच्या स्थगितीवर आमदार राजळे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात पंकजा मुंडे देतील तोच उमेदवार अशी भूमिका घेत, आता पंकजा मुंडे यांनी येथून उमेदवारी करावी, अशी मागणी लावून धरली आहे.
लवकरच मुंडे समर्थक आणि जुन्या निष्ठावंत भाजप स्थानिक नेत्यांचे शिष्टमंडळाने पंकजा मुंडे यांना भेटून उमेदवारीची मागणी करणार असल्याची चर्चा आहे. तसेच नजीक आलेल्या नवरात्र उत्सवात पंकजा यांना मोहटादेवी दर्शनासाठी निमंत्रण देत मोठी तयारी करून, शक्तिप्रदर्शनातून ताकत दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
शिवशक्ती परिक्रमा यात्रेत पंकजा मुंडेंनी मोहटादेवी भेट टाळल्याने चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांनी नवरात्रात आपण मोहटागडावर दर्शनाला येणार आहेत, अशा चर्चादेखील झाल्या. त्यामुळे एकंदरीत पाथर्डी मतदारसंघांतील भाजप अंतर्गत असलेली चलबिचल सध्या चर्चेत असून, भाजपसमोर आणि त्याच बरोबर आमदार मोनिका राजळेंसमोर नाराजी दूर करण्याचे एक आव्हान असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या सर्व विषयावर स्वतः पंकजा मुंडे यांच्याकडून अद्याप कसलेही वक्तव्य समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून, निश्चितच राजकीय वर्तुळात उत्सुकता असणार आहे.
पंकजा मुंडे यांनी राज्यात शिवशक्ती यात्रा काढून केलेला दौरा माध्यमात चर्चेत आला. दरम्यान, मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे जीएसटी न भरल्याचे कारण देत त्यांच्यावर जीएसटी विभागाने कारवाईची नोटीस बजावली. एकंदरीत पंकजा मुंडे सत्ताधारी भाजप पक्षात असताना त्यांना डावलले जात असल्याच्या आणि 2019 परळीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी आपले अस्तित्व नगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव मतदा संघातून सिद्ध करत, राज्याच्या मुख्य राजकीय प्रवाहात येऊन नेतृत्व करावे, यासाठी नगर जिल्ह्यातील त्यांना मानणारा वर्ग सक्रिय झाला आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.