Pune News : एमपीएससी पेपरफुटीचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच पुण्यात मात्र धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं असून, त्याच्याकडे सापडलेल्या शेवटच्या चिठ्ठीतून धक्कादायक कारण समोर आलं आहे. नारायण पेठ पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून, प्रथमेश देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मूळचा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील खासापुरी येथील रहिवासी होता. या घटनेनंतर आता पुण्यात खळबळ उडाली असून, राज्यभर संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश देशमुख हा पुण्यातील शनिवार पेठ परिसरातील पेपर गल्ली येथे राहत होता. तो मागील सुमारे आठ महिन्यांपासून येथे राहत होता. तर यूपीएससी आणि एमपीएससी या दोन्ही स्पर्धा परीक्षा त्याने दिल्या होत्या. पण त्याला त्यात यश आले नाही. त्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. यामुळे तो गावी परतण्याच्या विचारात होता.
दरम्यान, आता प्रथमेश देशमुख याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. ज्यात आत्महत्येमागचं प्राथमिक कारण समोर आलं आहे. प्रथमेशवर अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज होते. तर गावी दुष्काळामुळे सोयाबीनचे पीक वाया गेल्याने कुटुंबासमोरील आर्थिक संकट वाढल्याचे समोर आले आहे.
एकीकडे पेपरफुटी, कर्ज आणि दुसरीकडे कुटुंबासमोरील आर्थिक संकट यामुळे तो तणावात होता. दोन दिवसांपूर्वीच प्रथमेश गावाला गेला होता. तर घटनेच्या आदल्या दिवशी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या रुमवर आला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आता प्रथमेशने लिहिलेल्या सुसाइड नोटच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
प्रथमेशच्या वडिलांचे 4 वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्याच्या पश्चात आई आणि चार विवाहित बहिणी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रथमेश कुटुंबाला आर्थिक आधार देईल, अशी कुटुंबीयांची अपेक्षा होती. मात्र, प्रथमेशने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, आता शेतकऱ्यांच्या मुलांकडे, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडे राज्य सरकारने लक्ष द्यावे. पेपरफुटीवर तातडीने पाऊलं उचलावीत, असे आवाहन सरकारला केलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.