Bhagirath Bhalke  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalwedha Market Committee Election: मंगळवेढ्यात परिचारक-भालके युती कायम; भाजप आमदार आवताडेंची डोकेदुखी वाढणार

Prashant Paricharak - Bhagirath Bhalke Group: भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे भगिरथ भालके गटातील नेत्यांनी बाजार समितीची निवडणूकही समविचारीच्या माध्यमातून एकत्रित लढविण्याचा निर्धार कायम ठेवला आहे.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्यात समविचारी आघाडीच्या माध्यमातून घडवलेले परिवर्तन हे आमदारांसाठी धक्कादायक ठरले आहे. दामाजी कारखान्यानंतरच्या मोठ्या सहकारी संस्थांमध्ये गत निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून निवडणुकीला सामोरे जाताना परिवर्तनाचा निर्धार करावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी केले. (Prashant Paricharak-Bhagirath Bhalke group will jointly contest the Mangalveda Market Committee election)

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक मंगळवेढा येथील शिशुविहार येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे भगिरथ भालके गटातील नेत्यांनी बाजार समितीची निवडणूकही समविचारीच्या माध्यमातून एकत्रित लढविण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. या युतीमुळे भाजप आमदार समाधान आवताडे यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे.

भालके म्हणाले की, गत निवडणुकीत ग्रामीण भागात न पोचल्यामुळे पराभवास सामोरे जावे लागले. समविचारी आघाडी एकत्रित आल्यावरही विरोधकांनी आपले विजयाचे मार्जिन पाच हजाराच्या पुढे मोजा, असे आव्हान दिले होते. तरीही सभासदांनी ३ हजारांनी समविचारी आघाडीला विजय मिळवून दिला. उद्याच्या निवडणुकीत सभासदांपर्यत योग्य भूमिका मांडली, तर विजयी होऊ शकतो, असा विश्वास दिला.

दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील म्हणाले की, समविचारी आघाडीच्या ताब्यात शेतकऱ्याची मोठी संस्था असलेला दामाजी कारखान्याचा कारभार तालुक्यातील जनतेने दिला आहे. दिलेल्या विश्वासाला पात्र राहून काम करताना ऊस उत्पादकांची बिले ३१ मार्चपूर्वी दिल्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार करणे सोयीचे झाले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांची दुसरी मोठी संस्थाही शेतकऱ्यांच्या ताब्यात राहावी.

माजी नगरसेवक अजित जगताप म्हणाले की, समविचारी आघाडीच्या ताब्यात जनतेने दामाजीचा कारभार दिला आहे. संचालकांनी चांगल्या पद्धतीने काम करत ऊस उत्पादकाची बिले वेळेत दिली आहेत. हा समविचारीचा हा पॅटर्न राज्यभर चर्चेला गेला आहे. बाजार समितीची निवडणूकही समविचारीच्या माध्यमातून लढविण्याचा विश्वास उपस्थितांना दिला.

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने विजय संपादन केला, त्याप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही योग्य आणि कार्यक्षम उमेदवार निश्चित करून बाजार समितीची निवडणूक समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहे, असा दावा युन्नुस शेख यांनी केला आहे.

या वेळी संचालक औदुंबर वाडदेकर, लतीफ तांबोळी, गुलाब थोरबोले यांची भाषणे झाले. चंद्रशेखर कौडूभैरी यांनी आभार मानले. दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष तानाजी खरात, दामोदर देशमुख, रामचंद्र वाकडे, अरूण किल्लेदार, सोमनाथ माळी, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, मुरलीधर दत्तू आदींसह दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT