Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : पंढरपुरातील बैठकांतून परिचारकांची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की विधान परिषदेसाठी दबाबतंत्र?

Pandurang Parivar Meeting : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग परिवाराची यंत्रणा कार्यरत झाली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचीही चर्चा होत आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 30 June : लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे गलितगात्र झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचे काम सध्या भाजपच्या नेतेमंडळींकडून सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या ‘पांडुरंग परिवारा‘कडूनही पंढरपूर तालुक्यात सध्या बैठका घेतल्या जात आहेत. या बैठका म्हणजे विधानसभा निवडणुकीची तयारी की विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चाललेले पक्षीय पातळीवरील दबावतंत्राचा एक भाग आहे, असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सुमारे 40, 000 पेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले आहे. वास्तविक, पंढरपूरचे (Pandharpur) आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak), विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मंगळेवढ्यातील दामाजी कारखाना, पंढरपुरातील परिचारकांचे दोन कारखाने, कल्याणराव काळे यांचा कारखाना असे रथी महारथी सोबत असतानाही पंढरपूर मंगळवेढ्यातून भाजपच्या ऐवजी काँग्रेसला मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे महायुतीसाठी तो एक धक्का होता.

लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून कार्यकर्त्यांना बाहेर काढण्यासाठी परिचारक यांच्या पांडुरंग परिवाराकडून पंढरपूर तालुक्यात बैठका घेतल्या जात आहेत. त्याला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार आहे. भाजपचे केंद्रात आणि राज्यात सरकार असून अनेक चांगल्या योजना राबवूनही लोकसभा निवडणुकीत माढा आणि सोलापूरमध्ये भाजपला पराभव का स्वीकारावा लागला, याची कारणे या बैठकांतून जाणून घेतली जात आहेत.

दुसरीकडे, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पांडुरंग परिवाराची यंत्रणा कार्यरत झाली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचीही चर्चा होत आहे. सध्या महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे, त्यामुळे परिचारक यांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय खुद्द माजी आमदार प्रशांत परिचारक हेच घेणार आहेत.

विधान परिषदेची निवडणूकही ही जाहीर झाली आहे. विधान परिषदेसाठी सध्या प्रशांत परिचारक यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळूनही यश-अपयशाची चिंता करत बसण्यापेक्षा विधान परिषद पदरात पडून घेण्याचा प्रयत्न माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाकडून होऊ शकतो. त्यासाठीच सध्या पांडुरंग परिवाराच्या बैठका सुरू आहेत की काय, अशी चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT