Karhad South  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Atul Bhosale: तुम्हाला झोपडपट्टीचे पुनर्वसन जमले का?

Atul Bhosale: अतुल भोसले यांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका; वडगाव हवेली येथे प्रचारसभा

सरकारनामा ब्यूरो

Atul Bhosale : गेल्या ५० वर्षांत तुम्हाला तुमच्या घराशेजारच्या झोपडपट्टीचे पुनर्वसन करता आले नाही. जो पूल केंद्र सरकारने केलाय, तो स्वत:च उभारल्याच्या बाता कशासाठी मारताय? असा थेट सवाल करत महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.वडगाव हवेली येथे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, जयवंत पाटील, जयवंत शेलार, आप्पासाहेब गायकवाड, अशोकराव थोरात, माजी नगरसेवक सुहास जगताप, हणमंतराव पवार, स्मिता हुलवान, रणजित पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जयवंतराव जगताप, आप्पा माने, मोहनराव जाधव, काकासाहेब जाधव, सुलोचना पवार, राजेश पाटील- वाठारकर, ॲड. बाळासाहेब पाटील, बाळासाहेब यादव, राजेंद्र यादव, संपतराव थोरात, अशोक जगताप, दत्तात्रय देसाई, दादासाहेब थोरात, विवेक भोसले, सूर्यकांत पाटील, राजेंद्र जगताप, शिवराज जगताप, वसंतराव जगताप आदींसह मान्यवर उपस्थित होते.

अतुल भोसले म्हणाले, ‘‘गेल्या २०१९ च्या निवडणुकीत मला यशापर्यंत पोचता आले नाही; पण त्यावेळच्या निवडणूक निकालानंतर दुसऱ्या दिवसापासूनच सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन, लोकसेवेचे काम सुरू केले. त्या वेळी महायुतीच्या जास्त जागा निवडून येऊनही राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली.

त्यामुळे सुरुवातीच्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या लाटेत जयवंतराव भोसले यांचा विचार सोबत घेऊन सर्वसामान्य माणसाला या महामारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केले.

स्वतः सुरेशबाबांनी मैदानात उतरून लोकांची अखंड सेवा केली. ही रुग्णसेवा देताना कुठलाही भेदभाव, राजकीय गटतट बघितला नाही. शत्रू जरी असला, तरी त्याची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. कोरोनाची लाट ओसरताच राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली.

या अडीच वर्षांच्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून मी ७४५ कोटींचा; तर मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून २५० कोटींचा असा मिळून एकूण सुमारे १००० कोटींचा विकासनिधी कऱ्हाड दक्षिणच्या विकासासाठी आला आहे.’’

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘‘निवडणुकीचे मुद्दे बाजूला ठेऊन प्रचार दुसऱ्याच दिशेला नेण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहेत. त्यांच्या हातून आतापर्यंत काहीही विकास झाला नसल्यानेच त्यांच्यावर तसे करायची वेळ आली आहे.’’

मोहनराव जाधव, राजेंद्रसिंह यादव, आनंदराव पाटील, जगदीश जगताप यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी अशोकराव जगताप, बी. एम. पाटील, बाळासाहेब पाटील, सर्जेराव कणसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. या सभेला कार्यकर्ते व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT