Makarand Patil: खंडाळ्याच्या हक्काचे ३.३३ टीएमसी पाण्यामधील एक थेंब बाहेर जाऊ देणार नाही, असे सांगत खंडाळ्यात भव्य ट्रॉमा सेंटर उभारणार असल्याची ग्वाही महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
दरम्यान, तालुक्यातील तिन्ही उपसा सिंचन व वंचित १४ गावांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याचे आश्वासनही या वेळी त्यांनी दिले.
खंडाळा येथील प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, ॲड. शामराव गाडवे, दत्तानाना ढमाळ, मनोज पवार, शारदाताई जाधव, सुनील शेळके, शिवाजीराव शेळके, उज्ज्वला सपकाळ, राजेंद्र तांबे, बाळासाहेब सोनवणे, रवींद्र क्षीरसागर, दयानंद खंडागळे, गणेश धायगुडे, भानुदास यादव, शिवाजी मोरे, शैलेश गाढवे, सुरेश रासकर यांच्यासह खंडाळा नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, खंडाळा कारखान्याचे सर्व संचालक, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळी तालुक्यात धोम- बलकवडीचे पाणी आले. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती दूर होण्यास मदत झाली. शेखमिरवाडी, गावडेवाडी व वाघोशी उपसा सिंचन योजनेची कामे अंतिम टप्प्यात आहे, तर सध्या कॅनॉलचे उर्वरित काम सुरू आहे.
मात्र काही लोक अपप्रचार करत, बंदिस्त पाइपलाइन झाली, की पाणी थेट फलटण, बारामती, माळशिरसला जाणार असा चुकीचा प्रचार करत आहेत; पण कुणी काहीही बोलू द्या, निवडणूक आली की बोलघेवडे बोलत असतात. चार महिने अगोदर यायचं आणि विधानसभेवर दावा ठोकायचा.
इथल्या जनतेला सगळं माहीत झालेय. दोन्ही कारखाने वाचविण्यासाठी ४६७ कोटी रुपयांची मदत महायुती सरकारने केली. यामुळे देणी देण्यासह इतर कामे मार्गी लागल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
१५ वर्षांतील माझे काम तुम्ही पाहिले आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल चार हजार कोटींची विकासकामे केली. उन्हाळ्यातील टंचाई लक्षात घेत लोणंदसाठी ३५, तर खंडाळ्यासाठी ६५ कोटींची पाणी योजना मंजूर करून आणली. विकासकामांचा भाग म्हणून १५ कोटी रुपये खर्चून खंडाळ्यात ट्रामा सेंटरची इमारत होत आहे.
नितीन भरगुडे पाटील, बकाजीराव पाटील, देविदास चव्हाण, दत्तानाना ढमाळ, शारदाताई जाधव, शामराव गाढवे यांनी मनोगत व्यक्त करत मकरंद पाटील यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. गजेंद्र मुसळे यांनी सूत्रसंचालन केले, तर मनोज पवार यांनी आभार मानले.
भावनेपेक्षा व्यावहारिक विचार करा
येथील अडचणीत असलेल्या कारखान्यांची जबाबदारी तुमच्यामुळे स्वीकारली. शेतकरी, कामगार आणि दोन्ही कारखान्यांसाठी आमदारकी पणाला लावली. शरद पवार माझे दैवत होते, आहेत आणि राहतील. मी माझ्या स्वार्थासाठी गेलो नाही. मनात आणलं असतं तर पहिल्या दिवशी कॅबिनेट मंत्री झालो असतो; पण तसे केले नाही. भावनेपेक्षा व्यावहारिक विचार करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी उपस्थितांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.