Rohit Pawar News
Rohit Pawar News sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

श्रीगोंद्यावर पुन्हा पवारांचे 'लक्ष'

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - श्रीगोंदे विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसला थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर शेजारी असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांची तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्याच रोहित पवारांवर श्रीगोंदे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हत्तीचे बळ मिळले आहे. ( Pawar pattern will run in Shrigonda )

श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार करण्यासाठी पक्षाने कर्जत-जामखेडचे अॅक्टिव्ह आमदार रोहित पवार यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. श्रीगोंद्यात सगळे अलबेल असतानाही गेल्या विधानसभेला राष्ट्रवादी पराभुत झाली. त्यामुळे आता श्रीगोंद्यात 'राष्ट्रवादी पुन्हा' हा जल्लोष करण्यासाठी रोहितदादांना पाठविण्याचा निर्णय झाला आहे. येथे राष्ट्रवादीत एकी करतानाच सहकारी पक्ष काँग्रेसला विश्वासात घेवून 2014 ची पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा एकदा पवार कुटूंबाची ताकत राबणार आहेत.

विजयाची क्षमता असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आमदार होवू शकला नाही अशा ठिकाणी अॅक्टिव्ह असणाऱ्या युवा आमदारांनी लक्ष घालण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंथन झाले. त्यातूनच कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे श्रीगोंद्यासह, भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, व पंढरपुर अशा पाच विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभेला राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीगोंद्यात माजीमंत्री व जेष्ठ भाजपा आमदार बबनराव पाचपुते यांचे कडवे आव्हान आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी खुद्द शरद पवार यांनीच श्रीगोंद्यात लक्ष घालत जेष्ठनेते शिवाजीराव नागवडे, कुंडलीकराव जगताप, तुकाराम दरेकर, घनश्याम शेलार यांच्यासह इतर पाचपुते विरोधकांची मोट बांधत राहूल जगताप यांच्या रुपाने युवा आमदार दिला होता. शरद पवार यांनी तालुक्यावर लक्ष केंद्रीत केल्यावर काय होते याची झलक दाखविलीच होती.

आता ही जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्या खांद्यावर दिल्याचे दिसते. रोहित पवार हे एक परिपक्व आणि जिद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात. जेथे जातील तेथे त्यांची वेगळी छाप ते सोडतात. श्रीगोंदे हा त्यांचा शेजारचा मतदारसंघ असून येथील जीवंत राजकारण त्यांना परिचयाचे आहे. 2014 ला बापु-तात्या हे दुरदृष्टीचे नेते होते. त्यातच साहेबांनी लक्ष घातल्याने सगळ्यांनीच त्यांचा शब्द हेच प्रमाण मानल्याने जगतापांचा विजय व पाचपुतेंचा पराभव झाला.

यावेळी मात्र राजकारण बरेच फिरले आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. जगताप, नागवडे यांना उमेदवारी घ्या म्हणून पक्ष मागे लागला मात्र त्यांनी हात वर केले. त्यामुळे घनशाम शेलार यांच्याकडे ती उमेदवारी आली. त्यांचा निसटता झालेला पराभव पक्ष नेतृत्वाच्या जिव्हारी लागला. आणि त्यातूनच आता रोहित पवार यांना श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी 'नीट' करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जाते.

श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे संघटन तगडे असले तरी काँग्रेसला नागवडे कुटूंबाच्या रुपाने ताकत मिळाली आहे. त्यांना मानणारे कार्यकर्ते राष्ट्रवादीसोबत नसल्याचे सद्यस्थिती आहे. स्बबळाचा नारा दिला जात असल्याने रोहित पवार या दोन्ही काँग्रेसचा समन्वय कसा घडवितात त्याकडे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT