Petrol and Diesel Prices File Photo
पश्चिम महाराष्ट्र

मोदी सरकारचा निषेध अन् वाहनचालकांना पेट्रोल मिळालं चक्क एक रुपया लिटर दरानं!

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरांचा भडका उडाला असून, वाहनचालकांना दरवाढीचे चटके बसत आहेत.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 131 व्या जयंतीनिमित्त एक रुपयात पेट्रोल देण्याचा अनोखा उपक्रम सोलापुरात राबवण्यात आला. मोदी सरकारचा निषेध करण्याचेही कारण यामागे होते. एक रुपया पेट्रोल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर आज सकाळपासूनच वाहनचालकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. (Petrol Diesel price hike News)

या उपक्रमाचे आयोजन राहुल सर्वगोड यांनी केले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, सुमारे 500 लिटरपर्यंत पेट्रोल या योजनेअंतर्गत एक रुपया दराने देण्यात येत आहे. इंधनाचे दर आता 110 रुपयांवर गेले आहेत. बाबासाहेब जयंतीनिमित्त आणि मोदी सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा छोटासा उपक्रम राबवला आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर पहिल्या पाचशे लाभार्थ्यांना याचा फायदा देण्यात आला. या उपक्रमाचा फायदा करुन घेण्यासाठी आज सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून आली. एक रुपये लिटर दराने पेट्रोल मिळवण्यासाठी वाहनचालकांची झुंबड उडाली होती.

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली होते. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये झाला असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी आधीच दिला होता.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 100 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT