BJP-NCP alliance leaders celebrating victory in Phaltan NagarPalika elections after ending Ramraje Naik-Nimbalkar’s three-decade political dominance. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan Nagar Palika : रामराजेंची 35 वर्षांची हुकूमत रणजितसिंह यांच्याकडून खालसा! रामराजे गटाचं नेमकं काय चुकलं? वाचा सत्तांतराची Inside Story

Phaltan Election Result : फलटण नगरपालिकेत भाजप-राष्ट्रवादी युतीने रामराजे नाईक-निंबाळकरांची 35 वर्षांची सत्ता उलथवली. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली शहराच्या राजकारणाला नवे वळण मिळाले.

सरकारनामा ब्यूरो

Phaltan Election : फलटण माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या आक्रमक नेतृत्वाखालील भाजप- राष्ट्रवादी युतीने गेली 35 वर्षे जिल्ह्याच्या राजकारणावर हुकूमत गाजवणाऱ्या रामराजे नाईक- निंबाळकर यांना त्यांच्या वारसदाराचा पराभव पाहावा लागला. रामराजेंना हा पराभव अंतर्मुख करायला लावणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या विकासासाठी मिळालेल्या बलाढ्य साथीमुळे रणजितसिंह यांना विजयश्री खेचून आणता आली.

या निकालाने आगामी काळात शहरातील विकासाची नवी समीकरणे मांडली जाणार आहेत. पालिकेची निवडणूक ही दोन्ही नाईक- निंबाळकर घराण्यांसाठी अस्तित्वाची ठरली होती. निवडणुकीदरम्यान रामराजे यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकासाचा आलेख, राजकीय अनुभव आणि सत्तेतील पक्षाची ताकद पणाला लावूनही त्यांना पालिकेवरील सत्ता अबाधित राखण्यात यश आले नाही.

धोम- बलकवडीचे पाणी फलटणच्या माळरानावर पोहोचवून भगीरथ ठरलेल्या रामराजे नाईक- निंबाळकर यांना होमपीचवर मात देण्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना यश आले. विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा वारू त्यांनी ध्येयापर्यंत पोहोचवला. अर्थात, हे केवळ एकट्याचे यश म्हणता येणार नाही. त्यात राष्ट्रवादीचा वाटाही तितकाच महत्त्वाचा आहे. भाजप आणि राष्ट्रवादीची युती दादांच्या पथ्यावर पडली.

याशिवाय विधानसभेतील पराभवानंतर राजे गटाच्या लांबलेल्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत ताणलेली उत्सुकता आणि उमेदवारी मिळण्याच्या काळजीमुळे राजे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांची साथ सोडली. अशीच अवस्था विधानसभेला झाली होती. योग्य निर्णय घेण्यास झालेला उशीर धोकादायक ठरला. त्यांनी अखेर धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे तरी निवडणुकीत संघर्ष होऊन विजयी उमेदवाराचे मताधिक्य 600 मतांपर्यंत आले.

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही रामराजेंना पूर्ण ताकद दिली. प्रचारासाठी वाढीव वेळही मिळाला; पण काही ठिकाणी मर्जीतील उमेदवार देणे, ही राजे गटाची चूक ठरली. जनतेच्या मनातील कायम उपलब्ध असणारे उमेदवार दिले असते, तर चित्र वेगळे दिसले असते.

याशिवाय आरटीओ ऑफिस, नीरा-देवघरसाठीचा निधी, प्रशासकीय इमारत, सिमेंट काँक्रिट रस्ता, प्रशस्त पालखी मार्ग, सेशन कोर्ट, महसूल भवन, एमआयडीसी या कामांना हात घातला. भाजपच्या (BJP) माध्यमातून फलटणसाठी आणलेला निधी महत्त्वाचा ठरला. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्यात रणजितसिंह नाईक- निंबाळकर यशस्वी ठरले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडे मोठे इनकमिंग झाले. हीच परिवर्तनाची नांदी ठरली.

निर्णायक लढाईत निर्णयाला उशीर झाल्याचा फटाका राजे गटाला बसला. नगरपरिषदेत केलेल्या कामाचा अनुभव समशेरसिंह यांच्या कामी आला. गेली 30 वर्षे असलेली राजे गटाची सत्ता आणि त्याविरोधात तयार झालेली नाराजी हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा होता. शिवाय रस्त्यावरच्या लढाईत माजी खासदार सरस ठरले. कोणत्याच पक्षाचा झेंडा घेऊन राजकारण करण्यापेक्षा राजे गट म्हणून स्वतंत्रपणे वावर करणे, यामुळे रामराजेंना पक्षीय ताकद मिळवण्यात अपयश आले.

तिघांचे सूक्ष्म नियोजन ठरले महत्‍वाचे

ग्रामीण भागातील जनाधार कायम ठेवायचा असल्यास राजेंना चाकोरीबाहेर जाऊन विचार करावा लागेल, तरच येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत त्यांचा निभाव लागेल. धनुष्यबाणाच्या साथीने होणारी त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी होते, तेही पाहावे लागेल. मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म रणनीती आखली होती. या तिघांच्या नियोजनाला आणि महायुतीच्या एकजुटीला हे मोठे यश मिळाल्याचे मानले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT