Agasti Sahakari Sakhar Karkhana
Agasti Sahakari Sakhar Karkhana Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पिचड समर्थकांचा वाकचौरेंवर आरोप : ते राष्ट्रवादीचेच, भाजपमध्ये आलेच नव्हते

शांताराम काळे

अकोले ( जि. अहमदनगर ) - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. माजी मंत्री मधुकरराव पिचड ( Madhukarrao Pichad ) यांचे समर्थक असलेल्या कैलास वाकचौरे यांनी महाविकास आघाडीच्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज भरला. तसेच ते उद्या ( मंगळवारी ) मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर भाजपचे तालुकाध्यक्ष तथा पिचड समर्थक सीताराम भांगरे यांनी कैलास वाकचौरे यांच्यावर टीका केली आहे. ( Pitched supporters accuse Wakchaure: He belongs to NCP and never joined BJP )

सीताराम भांगरे म्हणाले, जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते कैलास वाकचौरे यांनी आज अगस्ती निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अर्ज भरला. तसेच उद्या ( मंगळवारी ) सकाळी 9 वाजता ठराविक कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्यामुळे पिचड पिता पुत्रांना धक्का बसला आहे. मात्र कैलास वाकचौरे हे राष्ट्रवादीत जाणार हे पिचड यांना मागील 15 दिवसांपूर्वीच माहीत असल्याने निवडणुकीवर कोणताही फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया सीताराम भांगरे व पिचड समर्थकांनी दिली. त्यामुळे आता अकोले तालुक्यात अगस्ती कारखान्यावरून राजकारण आणखी तापले आहे.

सीताराम भांगरे पुढे म्हणाले की, मागील अनेक वर्षे कळस येथील कैलास वाकचौरे यांना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्यासारखे सांभाळले होते. अगस्ती कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, विविध संस्थांवर प्रतिनिधित्व दिले होते. जिल्हा परिषदेचे कोणतेही काम असल्यास वैभव पिचडांना नव्हे तर कैलास वाकचौरे यांना भेटा असे सांगत. इतका मोठेपणा दिला, मात्र प्राथमिक शिक्षकांनी त्यांचा राग व्यक्त करत आमदार डॉ. किरण लहामटे यांना भेटून पाठिंबा व्यक्त करत गावागावात जाऊन प्रचार केला. नव्हे तर निवडणुकीत विजय केला, असा आरोप सीताराम भांगरे यांनी केला.

विधानसभा निवडणुकीत वैभव पिचड यांना अपयश येताच ज्येष्ठ नेते सीताराम गायकर यांच्यासह अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत गेले. कैलास वाकचौरे संधीची वाट पाहत होते व त्यांना नगरपंचायतमध्ये वैभव पिचड यांनी विश्वासात न घेतल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र जिल्हा परिषदेत तेच गट नेते आहे. तसेच राहिले याचा अर्थ तुम्ही चला पुढे मी नंतर कारण काढून येतो हे नियोजन करून अखेर कैलास वाकचौरे यांनी आज अगस्ती निवडणुकीत महाविकास आघाडीत सहभागी होऊन अर्ज भरला आहे. तर आजच ते सीताराम गायकर, अशोक भांगरे यांच्यासमवेत मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या ( मंगळवारी ) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे पिचड यांच्या राजकारणाला कोणताही फरक पडणार नाही. हे अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीतून सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी अंग चोरून काम केले

कैलास वाकचौरे राष्ट्रवादीत होते. केवळ वैयक्तिक लाभाच्या गोष्टीसाठी त्यांनी पिचड हे दैवत असल्याचे सांगितले. त्यांनी राष्ट्रवादीत राहून विधानसभेत नगरपंचायतमध्ये अंग चोरून काम केले, मात्र नगरपंचायतमध्ये महत्व मिळाले नाही. अकोले एज्युकेशनमध्ये स्थान मिळाले नाही म्हणून त्यांना रहावले आपण राष्ट्रवादी मध्ये जाणार त्यापूर्वी नगरपंचायत मधील आपले समर्थक सोबत घेऊन प्रवेश करणार असे समजताच वैभव पिचड यांनी ते थांबविले मग वाकचौरे आजारी पडले. पिचड पिता-पूत्र आपल्याला भेटायला येतील व मग आपली नाराजी व्यक्त करून अगस्ती कारखान्यामध्ये महत्वाचे पद घेऊ, असे त्यांना वाटले मात्र पिचड त्यांच्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी महाविकास आघाडीत सहभागी होऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. पिचड यांची या मागील खेळी निवडणुकीनंतर समजेल, असे सूचक वक्तव्य सीताराम भांगरे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT