Omraje Nimbalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Omraje Nimbalkar : सोलापुरातील नाट्य संमेलनाच्या उद्घाट्नापूर्वीच रंगले राजकीय नाट्य, ओमराजे निंबाळकरांचे नाव वगळले!

Political News : नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वीच राजकीय नाट्याचा अंक सुरू झाला असल्याची चर्चा रंगली आहे.

Anand Surwase

Solapur News : सोलापूरमध्ये होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन 27 जानेवारीला मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनासाठी निमंत्रणपत्रिकाही छापण्यात आल्या आहेत. मात्र, या निमंत्रणपत्रिकेमध्ये प्रमुख उपस्थितांच्या नावांमधून ठाकरे गटाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे नाट्यसंमेलानाच्या उद्घाटनापूर्वीच राजकीय नाट्याचा अंक सुरू झाला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

सोलापूरमध्ये होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 27 जानेवारी रोजी होणार आहे. सोलापुरातील नॉर्थकोट मैदानात हे नाट्य संमेलन पार पडणार असून संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते ओमराजे निंबाळकर (Omaraje Nimbalkar) हे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. धाराशिव मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदारसंघाचाही समावेश होतो. त्यामुळे खासदार निंबाळकर हे सोलापूर जिल्ह्याचेही लोकप्रतिनिधी मानले जातात. त्यासोबतच जिल्हा प्रशासनाकडून आयोजिण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलादेखील लोकप्रतिनिधी म्हणून ओमराजे हे नियमित उपस्थिती लावतात. परंतु मराठी नाट्य संमेलनाच्या संयोजकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव पत्रिकेतून वगळल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन पत्रिकेमध्ये संयोजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (uday samnat), सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनंगटीवार, सिनेअभिनेते मोहन जोशी यांना आंमत्रित केल्याचा उल्लेख केला आहे. तसेच या संमलेनासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी म्हणून सोलापूरचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची नावे छापण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदारांच्या नावांचाही पत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. एवढेच नाही, तर संयोजकांनी पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचीही नावे छापली आहेत. केवळ धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव या कार्यक्रमपत्रिकेतून वगळण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

चूक दुरुस्त करून व्हीआयपी पत्रिका छापू...

याप्रकरणी सरकारनामाच्या प्रतिनिधीने नाट्य संमेलनाच्या संयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव न छापण्यामागे कोणताही जाणिवपूर्वक हेतू नाही. ते धाराशिवचे विद्यमान खासदार असले तरी ते बार्शी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत असल्याची गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. त्यामुळे त्यांचे नाव पत्रिकेत घेण्याचे राहून गेले. मात्र, आता आम्ही व्हीआयपी नाट्यप्रेमी आणि प्रतिनिधींना देण्यासाठी दुसरी पत्रिका छापणार आहोत. त्या पत्रिकेमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नावाचा उल्लेख आवर्जून केला जाईल, अशी प्रतिक्रिया संयोजकांकडून देण्यात आली.

Edited By : sachin waghmare

R...

SCROLL FOR NEXT