Kolhapur .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Election 2025: राजाच्या झोपडीसमोर झळकला नेत्यांना चपराक लगावणारा 'बॅनर' ; पन्हाळ्यात चर्चांना उधाण

Local Body Election 2025: निवडणुका जाहीर झाल्या की, अगदी सामान्य माणूस ज्या, त्या निवडणुकीनुसार आपल्या मताचा दर ठरवत आहे. आणि जो उमेदवार, तो दर देईल त्याला मतदान केले जात आहे. यामध्ये कोणतेही तत्व नाही,अगर विवेक ठेवला जात नाही. सारं राजकारण भ्रष्ट झाले आहे.

Rahul Gadkar

Panhala News: सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गिरीस्थान नगरपालिकेतील एक फलक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. पन्हाळावरील राजाच्या झोपडी बाहेरील हा बोर्ड राज्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला आहे. नेहमीच जंगलातून घरात येणाऱ्या बिबट्याला आसरा देणारी ही राजाची झोपडी आता मात्र राज्यकर्त्यांना निवडणुकीसाठी (Election) येऊ नका, असा थेट संदेश देणारा फलक झळकवला आहे

पन्हाळगडावरील सुशिक्षित राज होळकर यांनी आपल्या घराच्या गेटवर लावलेला फलक सध्या पन्हाळावर नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत विषय ठरला आहे. इतकेच नव्हे तर समाज माध्यमावर त्यांनी आपली निवडणुकीबाबत असलेले मत देखील व्यक्त केले आहे.

नेमकं काय म्हणाले राज होळकर ?

सध्या महाराष्ट्रामध्ये आणि पन्हाळ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे चालू आहे. त्यानिमित्त मी माझे विचार प्रगट करत आहे. सध्या भारतातील लोकशाही संपलेली आहे, असे मला वाटते. सध्या भारतभर अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्य निवडीपासून ते लोकसभेच्या खासदारांपर्यंत सर्व निवडणुका या" मनी पॉवर,मसल पॉवर वर, आणि फ्रॉड वोटिंग" यामार्फत जिंकल्या जात आहेत.

निवडणुका जाहीर झाल्या की, अगदी सामान्य माणूस ज्या, त्या निवडणुकीनुसार आपल्या मताचा दर ठरवत आहे. आणि जो उमेदवार, तो दर देईल त्याला मतदान केले जात आहे. यामध्ये कोणतेही तत्व नाही,अगर विवेक ठेवला जात नाही. सारं राजकारण भ्रष्ट झाले आहे.

इथे उमेदवार आणि मतदार(Voter) दोघेही भ्रष्ट आहेत. त्यांची ही मानसिकता बदलायला हवी. परंतु पुढील अनेक वर्ष ही मानसिकता बदलेल, असं मला वाटत नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी माणसातील सद्सदविवेकबुद्धी जागृत व्हायला हवी. आणि त्यासाठी सुसंस्कार घडायला हवेत. या भ्रष्ट राजकारणाचा मला कंटाळा आला आहे. मला वीट आला आहे. त्यामुळे हे बदलेपर्यंत आपण या भ्रष्ट राजकारणाचा एक भाग व्हावा असे मला वाटत नाही.

आता पन्हाळ्याच्या राजकारणाविषयी म्हणाल तर, माझ्या पन्हाळ्यावर माझे प्रचंड प्रेम आहे. आमचा पन्हाळा म्हणजे मला माझे कुटुंब असल्यासारखे वाटते. सारे पन्हाळा वासिय माझे बांधव आहेत. सर्व पन्हाळा वासियावर माझे सारखेच प्रेम आहे. त्यामुळे एकमेकाविरुद्ध उभा राहिलेले उमेदवार हे माझ्यासाठी सारखेच आहेत. आता या उतारवयात एकाला मतदान करून दुसऱ्याला नाराज करावे आणि त्याचा रोष उडवून घ्यावा असे मला वाटत नाही.

पन्हाळ्यातील निवडणूक ही एक दिलाने व्हावी, साऱ्या नागरिकांनी एकत्र बसून, बाह्य राजकीय विचारांशिवाय, दबावाशिवाय, व हस्तक्षेपा शिवाय आपापल्या प्रभागातून एक एक प्रतिनिधी निवडून द्यावा, यामध्ये कोणत्याही प्रकारची इर्षा नसावी, वैरभाव नसावा. व निवडून दिलेल्या प्रतिनिधीनी "भ्रष्टाचार मुक्त" कारभार करावा हे माझे स्वप्नं आहे.( पण हे स्वप्न माझ्या या जन्मात पूर्ण होईल असे मला वाटत नाही.)

या सर्व कारणांमुळे मी व माझे कुटुंबीय या निवडणुकांमध्ये केव्हाही सहभागी झालेलो नाही आणि इथून पुढेही सहभागी होऊ इच्छित नाही. तरी कृपया निवडणूक संदर्भात आम्हाला कोणीही भेटू नये ही विनंती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT