Ranjitsinh Mohite Patil, Uttamrao Jankar, Sanjay Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : राष्ट्रवादीत फूट; सोलापुरात एकमेकांचे राजकीय विरोधक झाले सत्तेचे सोबती, मोहिते पाटील एकाकी ?

NCP Political Crisis : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा झेंडा बदला-बदलीचा राजकीय खेळ खेळला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रमोद बोडके

Solapur: सोलापू्र जिल्ह्यात राजकारणात जिल्हा परिषद, जिल्हा बँक, स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषद निवडणुकीत मोहिते-पाटील व शिंदे बंधू या दोन घराण्यांची भूमिका निर्णायक मानली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात या दोन कुटुंबामध्ये असलेला संघर्ष आता रंजक वळणावर आला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केलेली एन्ट्री अनेकांची राजकीय कोंडी करू लागली आहे.

अजित पवारांनी रविवारी (दि.२) शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा समावेश झाला. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदार संघ निर्माण झाल्यापासून (२००९) आजपर्यंत कायम चर्चेत आहे.

आता मोहिते-पाटील यांचे राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार संजय शिंदे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर आता एकाचवेळी राज्यातील सत्तेच्या निमित्ताने मोहिते-पाटील यांचे सोबती झाले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यात, सोलापूर जिल्ह्यात आणि मुंबईत मोहिते-पाटलांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माढ्यातून २००९-१४, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी २०१४ -१९ असे राष्ट्रवादीचे दिल्लीत प्रतिनिधित्व केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या आमदार संजय शिंदे यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. माढ्यात राष्ट्रवादीला पहिल्यांदा हार मानावी लागली. या पराभवात मोहिते-पाटलांचा मोलाचा वाटा आहे. मोहिते-पाटलांनी माढ्यातून भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली.

पण आता खासदार नाईक-निंबाळकर व मोहिते-पाटील यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार शिंदे-फडणवीस सरकार(Shinde Fadnavis Government)मध्ये आल्याने आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, माळशिरसचे नेते उत्तम जानकर यांच्या माध्यमातून खासदार निंबाळकर यांना सोलापूर जिल्ह्यातून मोठी ताकद मिळाली आहे. हीच ताकद मोहिते-पाटील यांच्यासाठी आगामी काळात डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

माढ्याची उमेदवारी येऊ शकते पुन्हा चर्चेत

२०१९ च्या निवडणुकीत माढ्यातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी अशी मागणी होत होती. उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली जोडी विभक्त झाली.

२०२४ ची खासदारकी माढ्यातून लढण्यासाठी भाजपचा उमेदवार कोण? आणि भाजपच्या विरोधात उमेदवार कोण? हे प्रश्‍न जिल्ह्याच्या राजकारणातील रंजकता वाढविण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा झेंडा बदला-बदलीचा राजकीय खेळ खेळला जाण्याची शक्यता आहे.

शरद पवारांनाही जिल्ह्यात नाही ठोस पर्याय

मोहिते-पाटील राष्ट्रवादीत होते तोपर्यंत जिल्ह्यात पक्षाची ताकद व्यवस्थित होती अशी भावना आजही अनेकजण व्यक्त करत आहेत. अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर ग्रामीण भागातील राष्ठ्रवादीचे बहुतांश नेते अजित पवार(Ajit Pawar)यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे शरद पवार यांना सध्यातरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ठोस चेहरा दिसत नाही. पवार यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यात नसलेला ठोस चेहरा व मोहिते-पाटील यांची भविष्यात राजकीय कोंडी होण्याची असलेली शक्यता यामुळे भविष्यात जिल्ह्याच्या राजकारणात शरद पवार व मोहिते-पाटील हे एक झाल्यास आश्‍चर्य वाटू नये.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT