Political Holi  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rangpanchami special : सोलापुरी राजकीय रंगपंचमी....!

सोलापूर जिल्ह्यात नेतेमंडळींचा शिमगा अन् राजकीय रंग उधळणं हे कायमच सुरू असतं.

सरकारनामा ब्यूरो

शिवाजी भोसले

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात नेतेमंडळींचा शिमगा अन् राजकीय रंग उधळणं हे कायमच सुरू असतं. आज रंगपंचमीनिमित्त जिल्ह्यातील काही नेतेमंडळींना आपण ‘अक्षर रंग’ लावतोय. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिका यांच्या निवडणुकीची धूलवड पुढे गेली असली तरी आमदारकी अन् खासदारकीच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या नेतेमंडळींनी राजकीय रंग लावणं सुरु ठेवलं आहे. त्याचा हा स्पेशल रिपोर्ट... (Political Rangpanchami of Solapur)

सुशीलकुमार शिंदे : यांच्या ध्यानी, मनी आणि स्वप्नी ‘तिरंगा’ हाच रंग बरं का. आपल्याला आव्हान देणारं नेतृत्व सोलापुरात उभा राहू नये, यासाठी त्यांनी आजवर अनेक रंग खेळले. पण, तिरंग्याशी ते एकनिष्ट राहिले. सोलापूर लोकसभा निवडणुकीचा रंग खेळण्यावर अद्याप ते तटस्थ असले अन॒ मलिकार्जुन खर्गे, नाना पटोले यांनी कितीही विरोधात रंग उधळले तरी शिंदे हे लोकसभेची रंगपंचमी ‘तिरंगा’ रंगाने खेळणार बरं. ‘जनवास्तल्य’वर रंग घेऊन जाताना तिरंगाच घेऊन जा. वाटलं तर चेतनभाऊंशी संपर्क करा.

प्रणिती शिंदे : त्यांना भाजपचं ‘कमळ’ हाती घेत ‘भगवा’ रंग घेऊन रंगपंचमी खेळावी, अशी ऑफर असल्याने प्रणितीताईंना लावण्यासाठी ‘तिरंग्या’पैकी कोणातही रंग घेऊन जावा. तसं त्यांचं अजूनही ‘भगवा’ हाती घेण्याचं ठरलेलं नाही. भगव्याची त्यांना अ‍ॅलर्जी आहे बरं. अगदी त्यांच्या पित्याप्रमाणे. चुकून भगवा रंग घेऊन गेला तर ‘क्लीन बोल्ड’ करतील तुम्हाला. त्यांचा ‘क्लीन बोल्ड’ काय असतो, हवं तर विचारा रोहित पवारांना.

सुभाष देशमुख : होटगी रस्त्याला सुभाषबापू देशमुखांच्या वाद्‌ग्रस्त बंगल्यात रंग खेळायला जाताना भगवा बिनधास्त घेऊन जावा. उदय पाटलांचं अतिक्रमण ‘दक्षिण’मध्ये होईल की काय? याचं टेन्शन सुभाषबापूंना आहे बरं का, तेव्हा त्यांचा मुड बघून रंग खेळायला जा. त्यांच्या मूडबद्दल सांगायला अविनाश महागावकर आहेतच की.

विजयकुमार देशमुख : काळजापूर मारुतीजवळच्या विजयकुमार देशमुखांकडे भगव्याची उधळण ठरलेलीच; कारण, मालकांची भगव्यावर खूप निष्ठा. ‘सही दिशा अन् स्पष्ट निती’ हेच मालकांचं पक्षाप्रमाणं धोरण. पण उदय पाटील आणि धर्मराज काडादी यांच्यामुळं मालक म्हणे टेंन्शमध्ये आहेत. काडादींपेक्षा मालकांना अण्णांचं अवघड वाटतं. तरीपण मालक ‘उत्तर’मध्ये विधानसभेला स्वत: रंग उधळणार की सुपुत्र डॉ. किरण यांना संधी देणार? यावरही रंग उळधणं अवलंबून आहे.

दिलीप माने : ‘झेडपी’समोरच्या माने बँकेत रंग लावायला जाणार असाल तर रंग कोणता न्यायचा हे ठरवा आणि मगच जा. कारण मालकांनाच कोणता रंग धार्जिण नाही, असं झालंय. ‘भगवा’ सोडून बारामतीकरांचा ‘पॉवर’बाज रंग हाती घेऊन राजकारण करावं म्हटलं, तर बारामतीकरांचीच सरकारमधली टिकटिक बंद झालीय. त्यांचा रंगाचा बेरंग झाला. त्यामुळे मालकांचं अवघड झालयं. तेव्हा त्यांच्याकडे रंगपंचमी खेळायला जाण्यापूर्वी शिवाजी घोडकेंचा सल्ला घ्या.

धर्मराज काडादी : डफरीन चौकात गंगा निवासमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठी जात असाल तर बिनदिक्कतपणे कोणताही रंग घेऊन जा. धर्मराज काडादी म्हणजे राजू मालकांना कोणताही रंग आवडेल. तशी त्यांनी मानसिकता करुन घेतली आहे. कारखान्याची चिमणी, शेतकऱ्यांचे हित या आडून राजू मालकांनी जणू सगळेच रंग ‘मॅनेज’ केलेत. केतन शहा आणि सोलापूर विकास मंच यांच्याच फक्त रंगांची त्यांना अ‍ॅलर्जी आहे बरं.

महेश कोठे : मुरारजी पेठेत महेश कोठे यांना रंग लावायला जाणार असाल तर कोणता रंग घेऊन जाणार याची फिकिर करु नका. महेशअण्णांना कोणताही रंग चालू शकतो. कारण त्यांनी अद्याप कोणताच रंग फायनल केलेला नाही. आमदारकी मिळवायची, हे मात्र त्यांचं फायनल आहे. त्यासाठी वाटेल तो रंग त्यांना चालू शकतो.

जयसिद्धेश्वर महास्वामी : शेळगीला खासदार महास्वामी यांच्या मठात फक्त भगवाच चालेल. ‘सत्यमेव जयते, मी देशसेवा करण्यासाठी खासदार’ असं सांगणार्‍या महास्वामींनी खासदारकीसाठी आणि ती टिकविण्यासाठी किती खोटे रंग उधळले, हे जगाला माहिती आहे. पण, तिथे चालणार फक्त भगवाच, त्याच्या आडून खोटेपणाचे कितीही चालू शकतात रंग.

राजन पाटील : बारामतीकरांना चालणारा रंग घेऊन अनगरला राजन पाटलांना रंग लावायला जाणार असेल तर विचार करा. मालकांला तो रंग आता चालणार आहे का, शिवाय रंगपंचमी खेळण्यासाठी राजन मालक हे अनगर ग्रामपंचायत किंवा कारखान्यावर आहेत का, आमदार बबनराव शिंदे (दाजी) यांच्याकडे ‘भगवा’ रंग घेऊन धुलवड कशी खेळायची, हे विचारला गेलेत, खात्री करा बरं. कारण आता म्हणे त्यांचं दाजीच ठरविणार आहेत.

उमेश पाटील : पवार परिवार आणि राष्ट्रवादीशी नातं सांगत, रंग उधळणारे उमेश पाटील यांना बारामतीकरांचा रंग बिनधास्तपणे घेऊन जावा. राजन पाटील यांनी भगवा रंग हातात घेऊ द्या, अगर अन्य काही. बारामतीकरांच्या जीवावर उड्या मारत रंग उधळणं यामध्ये धन्य मानणारे पाटील यांना स्वत:च्या वैयक्तीक नेतृत्वाचे रंग उधळणे हेच त्यांच्यासाठी भारी बरं का.

मोहिते पाटील : अकलूजला ‘शिवरत्न’ वरही आता भगवा चालेल. माढ्याचे शिंदे, फलटणकर रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या केवळ रंगांची अ‍ॅलर्जी मोहिते-पाटील बंधू यांना आहे. ते आणि अन्य काहीजण वगळता अन्य जणांचे रंग त्यांना चालतील. दिलीप सोपल आणि रश्मी बागल यांना त्यांच्या पक्षाप्रमाणं ‘भगवा’ रंग लावायला जाल, ते स्वीकारतीलदेखील. पण ते मनापासून नाही. कारण ‘भगव्या’ रंगाच्या पक्षात ना त्याचं तन आणि मन असं काहीच नाही बरं का.

अभिजित पाटील : ‘रंगात रंग माझा वेगळा’ असे दर्शन नेहमी घडविणाऱ्या पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीला रंग लावल्यानंतर राजकारण्यांना रंग लावायला जाणार असाल तर कोणता रंग घेऊ याची काळजी करु नका. ‘विठ्ठला कोणता झेंडा हाती घेऊ?’ असा प्रश्‍न असणाऱ्या अभिजित पाटील यांना बारामतीकरांचा शिवाय भाजपचा भगवा असा कोणताही रंग चालू शकतो..

लक्ष्मण ढोबळे-संजय शिंदे : आजवर राजकारणात ढोबळ मानाने रंग उधळणारे प्रा. लक्ष्मण ढोबळेंना लावण्यासाठी आता भगवाच घेऊन जावा. कारण कन्या आणि चिरंजीव यांच्या राजकीय करिअरसाठी ते सोलापूर लोकसभेला आणि मोहोळ विधानसभेला भगवाच रंग उधळण्याच्या बेतात आहेत. माढ्यात संजयमामांना रंग लावायला जाणार असाल तर भगवा आणि बारामतीकरांचा ‘पॉवर’बाज रंग चालू शकतो. कारण भाजप आणि बारामतीकर यांना संजयमामांच्या रंगाची गरज आहे. तिथे आमदार बबनदादा भेटले आणि त्यांना तुम्ही ‘भगवा’ रंग लावायला गेला तर ते फारसे खवळणार वगैरे नाहीत बरं का.

दीपक साळुंखे-शहाजी पाटील : सांगोल्यात सध्या कोणता रंग वेगळा आहे, तेच समजत नाही. शहाजीबापू आणि दीपकआबा हे दोघे मिळूनच सध्या रंग उधळत आहेत, तेव्हा कोणताही रंग आपण तिथे नेऊ शकता. मंगळेवढ्याला दामजीपंतांना रंग लावून पुढे राजकारण्यांना रंग लावणार असाल तर ‘भगवा’ रंग लाऊन आवताडे यांचं आणि तुमचं स्वत:चं समाधान करुन घ्याल. येथे भगीरथ भालके आणि प्रशांत परिचारक भेटले तर दोन वेगवेगळ्या रंगाच्या पुड्या वेगवेगळ्या खिशातून काढू शकता.

नारायण पाटील-रश्मी बागल : करमाळ्याला कोणताही रंग चालतो या भ्रमात आपण जाल, पण तसं नाही. फक्त कारखाना चालू करण्यासाठी नारायण पाटील आणि रश्मी बागल या मंडळींनी तत्कालीन वेळी रंग उधळले. आता मात्र त्यांना चालणारेच रंग घेऊन जा.

बळीराम साठे-शहाजी पवार : उत्तर सोलापूर तालुक्याचं म्हणाल तर पवार बंधूंची जोडगोळी आहेच, भगव्या रंगांच्या बादल्या घेऊन रंगपंचमी खेळायला. दुनिया इकडे तिकडे होऊ द्या. त्यांचा ठरलेला रंग मात्र पक्का. वडाळ्यात अजूनतरी बारामतीकर पवारांचा पॉवरबाज रंग घेऊन काका साठे बसलेले दिसतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT