Sahyadri Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad : जिल्हाध्यक्षांच्या पलटीने भाजप आमदाराच्या इराद्यांना सुरुंग; पृथ्वीराजबाबांच्या घरच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी

BJP : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीत उभी फूट पडली. ज्या उत्साहाने बाजार समिती निवडणूक पॅटर्न राबवण्याचा विचार करून सर्व विरोधक एकत्र आले होते, त्याच वेगाने ही आघाडी विखुरली.

Hrishikesh Nalagune

Karad News : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांच्या आघाडीत उभी फूट पडली. ज्या उत्साहाने बाजार समिती निवडणूक पॅटर्न राबवण्याचा विचार करून सर्व विरोधक एकत्र आले होते, त्याच वेगाने ही आघाडी विखुरली. अगदी दुपारी अडीच वाजेपर्यंत एकसंध असणारा विरोधी गट पावणेतीनच्या सुमारास दुभंगलेला होता. या दुभंगलेल्या आघाडीचा आता सत्ताधारी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलला थेट फायदा होण्याची शक्यता आहे.

जवळपास 60 हजार सभासद असलेल्या सह्याद्री साखर कारखान्यावर मागील अनेक वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता आहे. बहुतांश निवडणुका बिनविरोध किंवा एकतर्फीच झाल्या. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांचा पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवले. त्या दिवसापासून कारखाना जिंकून पाटील यांना दुसरा दणका देण्यासाठी घोरपडेंनी बाह्या सरसावल्या. यासाठी बाजार समिती पॅटर्न राबवून सर्व विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकायचा असे ठरवण्यात आले.

त्यासाठी आमदार मनोज घोरपडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ असे सगळे एकत्र आले होते. विरोधी गोटात चालेल्या या घडामोडींमुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. सत्ताधारी आणि विरोधी गट अशीच दुरंगी लढत होईल, अशी चिन्हे होती. त्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठकाही सुरू होत्या. पण भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या विरोधी आघाडीला सुरुंग लागला.

कराड खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना आमदार मनोज घोरपडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी अखेरच्या काही वेळात काय घडले याची माहिती दिली. ते म्हणाले, अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत सकारात्मक चर्चा सुरू होती. जवळपास 17 हुन अधिक जागांवर एकवाक्यता झाली होती. त्याचवेळी तळबीड गटातील एका जागेवरून काही मतभेद होते.

आम्ही नाव सुचवले त्याला काहींनी आक्षेप घेतला होता. हा आक्षेप योग्य की अयोग्य? यावर चर्चा होण्यापूर्वीच काही नेते बैठकीतून निघून गेले. (इथे त्यांचा रोख भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडे होता. कारण तेच अडीचच्या दरम्यान, चालू बैठकीतून उठून गेले होते.) तळबीड गटातील एका जागेवर मतभेद असल्याने त्या जागेवर दोन अर्ज कायम ठेवायचे आणि अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर पुन्हा चर्चेला बसायचे. त्यात एका नावावर शिक्कामोर्तब करायाचे असे आमचे मत होते.

चर्चेत जे नाव फायनल होईल, त्या नावाला दुसऱ्या उमेदवाराने पाठिंबा जाहीर करावा असाही पर्याय चर्चेवेळी ठेवला होता. त्यामुळेच सह्याद्री कारखान्याची निवडणूक दुरंगी होईल असा आम्हाला विश्वास होता. मात्र चर्चेत एकवाक्यता असताना केवळ एका जागेवरून चर्चेतून उठून जात पूर्ण पॅनेल उभारण्याची तयारी काही लोकांनी केल्याचे आम्हाला जाणवले, अशी खंतही त्यांनी धैर्यशील कदम यांचे नाव न घेता व्यक्त केली.

आता निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी.डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह उंडाळकर यांच्या नेतृत्वात दुसरे पॅनेल आणि पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील कदम आणि निवास थोरात यांचे तिसरे पॅनेल राहणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 21 जागांसाठी 70 अर्ज कायम राहिले आहेत. मात्र यातील काही जण आम्हाला पाठिंबा देतील. चिन्ह वाटप व्हायचे आहे, तोपर्यंत चर्चेचा मार्ग खुला आहे, असे म्हणत घोरपडे अजूनही विरोधी गटाच्या एकीसाठी आशावादी आहेत. पण विरोधकांची ही फूट सत्ताधाऱ्यांना पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT