
Karad News : भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्याच्या इराद्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी धक्का दिला आहे. जागा वाटपाच्या भूमिकेवरून एकमत न झाल्याने पृथ्वीराज चव्हाण, उत्तरचे काँग्रेस अध्यक्ष निवास थोरात आणि धैर्यशील कदम यांनी स्वतंत्र राहत तिसरे पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी आघाडीतील या दुफळीचा आता थेट फायदा सत्ताधारी पॅनेल आणि माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना होण्याची शक्यता आहे.
जवळपास 60 हजार सभासद असलेल्या सह्याद्री साखर कारखान्यावर अनेक वर्षांपासून बाळासाहेब पाटील यांची एकहाती सत्ता आहे. बहुतांश निवडणुका या बिनविरोध किंवा एकतर्फीच झाल्या. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. भाजप नेते मनोज घोरपडे यांनी त्यांना आस्मान दाखवले. त्या दिवसापासून कारखाना जिंकून पाटील यांना दुसरा दणका देण्यासाठी घोरपडेंनी बाह्या सरसावल्या. यासाठी बाजार समिती पॅटर्न राबवून सर्व विरोधकांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शड्डू ठोकायचा असे ठरवण्यात आले.
विरोधी गोटात चालेल्या या आक्रमक घडामोडींमुळे निवडणुकीचे वातावरण तापले होते. सत्ताधारी व विरोधी गट अशीच दुरंगी लढत होईल, अशी चिन्हे होती. त्यासाठी विरोधकांच्या जोर-बैठकाही सरू होत्या. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधक ताकदीने उतरणार असल्याने विरोधकांकडेही उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या होती. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशीपर्यंत तब्बल 252 अर्ज दाखल झाले होते. इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे सत्ताधारी पॅनेल आणि बाळासाहेब पाटील यांची धाकधूक चांगलीच वाढली होती.
पण पहिली माशी शिंकली ती अर्ज छाननीवेळी. विरोधकाकडील उमेदवार निवास थोरात यांच्यासह सत्ताधारी गटाचे मानसिंगराव जगदाळे आणि अन्य 8 अर्जावर हरकत घेतल्याने त्यांचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बाद ठरवले. त्यावरून विरोधी गटातील मने पहिल्यांदा दुभंगली. अवैध अर्जासाठी प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे अपील झाले. त्यात जगदाळे वगळता उर्वरित नऊ अर्ज वैध ठरले. त्यामुळे काँग्रेसच्या निवास थोरातांना दिलासा मिळाला. पण त्या निर्णयावर पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल झाली.
या घडामोडीनंतर काल विरोधी गटातून पुन्हा एकदा एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी आमदार मनोज घोरपडे, अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी त्यासाठी प्रयत्न केले. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी विरोधी गटाच्या उमेदवारांची यादी अंतिम करण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यावर सर्व नेत्यांसमवेत बैठक सुरू झाली. त्यात कराड, तळबीड, उंब्रज, मसूर गटातील उमेदवारीवरून विरोधकांत खडाजंगी झाली. त्यावर बराच वेळ घमासान सुरू होते.
दरम्यान, काँग्रेस-भाजपच्या नेत्यांना एकमेकांची भूमिका न पटल्याने त्यांच्यात खडाजंगी झाली. त्यामुळे अॅड. उंडाळकर आणि कदम बैठक सुरू असताना त्यातून उठून गेले. अगदी दुपारी अडीच वाजेपर्यंत एकसंध असणारा विरोधी गट पावणेतीनच्या सुमारास दुभंगला. आमदार केवळ दोन जागा देत होते, असा आरोप धैर्यशील कदम यांनी केला. जेव्हा एकत्र लढण्याचे ठरते तेंव्हा प्रत्येकाला समान संधी देणे गरजेचे आहे. मात्र विद्यमान आमदारांनी तो प्रस्ताव मान्य केला नाही. कराडची अस्मिता आणि स्वाभिमान आम्ही स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात असल्याचे, कदम यांनी स्पष्ट केले.
आता निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पी.डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे, उदयसिंह उंडाळकर यांच्या नेतृत्वात दुसरे पॅनेल आणि पृथ्वीराज चव्हाण, धैर्यशील कदम आणि निवास थोरात यांचे तिसरे पॅनेल राहणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी 21 जागांसाठी 70 अर्ज कायम राहिले आहेत. मात्र यातील काही जण आम्हाला पाठिंबा देतील. चिन्ह वाटप व्हायचे आहे,तोपर्यंत चर्चेचा मार्ग खुला आहे, असे म्हणत घोरपडे अजूनही विरोधी गटाच्या एकीसाठी आशावादी आहेत. पण विरोधकांची ही फूट सत्ताधाऱ्यांना पथ्यावर पडल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.