Satara, 21 November : जिल्हा परिषदेसह 11 पंचायत समितीतील स्वीकृत सदस्य निवडीसंदर्भात येत्या बुधवारी (ता. 25 नोव्हेंबर) गटनेत्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली बैठक होणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेनंतर आता महायुतीमध्ये जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्य निवडीवरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपचे नेते पुन्हा आपली ताकद दाखवत गोकूळप्रमाणे जिल्हा परिषदेसह 11पंचायत समितीतही आपल्या विचारांचे स्वीकृत सदस्य आणणार का याची उत्सुकता ताणली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे निर्णय घेऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला आहे. त्यामुळे भाजपचे नेतेमंडळी मित्रपक्षांच्या भूमिकेवर नाराज आहेत. तसेच, जिल्हा परिषद अध्यक्षपदावेळी झालेल्या फोडाफोडीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी नाराज होते. पण, नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत वरिष्ठांकडून आलेला निर्णय न घेतल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत, त्यामुळे त्याचे उट्टे स्वीकृतच्या निवडीत निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या पदाधिकारी निवडीनंतर महायुतीत सुरू झालेला संघर्ष आणखी बळावण्याची शक्यता आहे. येत्या बुधवारी (ता. 25 नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी साडेबारा वाजता जिल्हा परिषद व पंचायत समितीतील गट नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
या बैठकीत जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीत प्रत्येक पक्षाच्या सदस्य संख्येनुसार कोटा ठरविण्यात येणार आहे. या कोट्यानुसार प्रत्येक पक्षाच्या गट नेत्यांना स्वीकृत सदस्यांसाठीचे नामनिर्देशन पत्र दिले जाणार आहे, तसेच स्वीकृत सदस्यांसाठी असलेली शासनाची मार्गदर्शक सूचना काय आहेत हे सांगण्यात येणार आहे.
सदस्यांना असलेली शैक्षणिक पात्रता, इतर पात्रता याची माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर गट नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या कोट्यानुसार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन, पाच किंवा सात दिवसांची मुदत दिली जाईल.
ज्या पंचायत समितीत दोन्ही पक्षांचे संख्याबळ समान असेल तेथे चिठ्ठीद्वारे कोटा ठरवली जाईल. त्यानंतर निवडीची तारीख व वेळ ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी घेतलेली भूमिकेवरून भाजपच्या नेत्यांत नाराजी आहे. याचा फटका या स्वीकृत सदस्य निवडीत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याच विचारांचे स्वीकृत सदस्य होण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच रंगणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.