Mangalvedha, 27 September : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील शेतकरी, सर्वसामान्यांना सध्या विविध पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. पण, भालके कुटुंबाला लढायची आणि संघर्ष करून न्याय मिळवून द्यायची सवय आहे. सत्तेत जाऊनही जनतेला भेडसावत असलेल्या प्रश्नांमुळे सध्या घुसमट होत आहे, अशी खंत पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, सासऱ्याप्रमाणे संघर्ष करून मंगळवेढ्याला न्याय देण्याची ताकद तुमच्यात आहे, त्यामुळे भविष्यात तुम्ही या भागाचे नेतृत्व करावे, असे साकडे उपस्थितांनी डॉ. प्रणिता भालके यांना घातले. त्यावर ‘तुम्ही बरोबर असाल, तर माझी लढण्याची तयारी आहे,’ असे सांगून प्रणिता भालकेंनी विधानसभा लढण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील राजमाता गणेश मंडळाच्या आरतीनंतर नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील संकेत दिले. या वेळी दामाजी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग चौगुले, नामदेव वरकुटे, पांडुरंग वरकुटे, संभाजी वरकुटे, महादेव वरकुटे, सर्जेराव कोळेकर, रामचंद्र वरकुटे आदीसह या भागातील तरुण व महिला उपस्थित होत्या.
पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि त्यांचे पती भगीरथ भालके यांनी पाच महिन्यांपूर्वी अनिल सावंत यांच्या समवेत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, पंधरवड्यापूर्वी विठ्ठल परिवारातील एका नेत्याने विधानसभेसाठी शिवसेनेतून अनिल सावंत यांच्या उमेदवारीचे समर्थन केले, त्यामुळे भगीरथ भालके यांची भूमिका काय असणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकताना असताना सत्तेत जाऊनही मतदारसंघातील प्रश्न सुटत नसल्याद्दल नगराध्यक्षा डाॅ प्रणिता भालकेंनी व्यक्त केलेली खंत चर्चेची ठरत आहे.
नगराध्यक्षा डॉ.भालके म्हणाल्या, यंदाचा दुष्काळ अतिशय कठीण आहे. पण, या दुष्काळी संकटाचा सामना तर करावाच लागणार आहे. शेतीबरोबरच पिण्याचे आणि जनावरांना चारा-पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मंगळेवढा तालुक्याच्या हिश्श्याचे म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. शेजारच्या तालुक्याला त्यांच्या मागणीप्रमाणे हवे तितके पाणी मिळते.
सोनके तिसंगी तलावात पाणी सोडण्यासाठी त्या भागातील शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला. मात्र, दोन्ही तालुक्याला लागणाऱ्या पाण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पाणी वाहून गेले. त्याचबरोबर सध्या जनावरांच्या छावण्या सुरू होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व दिलासा देण्याची आवश्यकता आहे
2013 मध्येही यंदाच्या दुष्काळासारखी परिस्थिती ओढावली होती. मात्र (स्व.) भारतनाना भालके यांनी आपली ताकद या भागातील शेतकरी, जनतेच्या हितासाठी लावून एकट्या मंगळवेढ्यासाठी स्वतंत्र जीआर काढण्यास भाग पाडले होते. मात्र, सध्या जनतेचे होत असलेले हाल पाहवत नाहीत. सत्तेत असूनही संघर्ष करावा लागत आहे. येत्या काही दिवसांत मंगळवेढ्यातील प्रश्नासंदर्भात आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहे. पण जी साथ भारतनानांना तुम्ही दिली, तशी साथ आपणालाही द्यावी, असे आवाहन प्रणिता भालके यांनी केले.
या वेळी उपस्थित ज्येष्ठ शेतकऱ्यांनी सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता संघर्ष करण्याची गरज आहे आणि तालुक्याला न्याय देण्याची ताकद सासरे भारतनाना भालकेंप्रमाणे तुमच्यात आहे, त्यामुळे भविष्यात तुम्ही या भागाचे नेतृत्व करावे, असे साकडे डॉ. प्रणिता भालके यांना घातले. त्यावर ‘तुम्ही बरोबर असाल तर माझी लढण्याची तयारी आहे,’ असे सांगत प्रणिता भालकेंनी विधानसभेचे रणशिंग फुंकल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.