पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भगीरथ भालके गटाने भाजपला धक्का देत तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले.
आमदार (स्व.) भारत भालके यांच्या सूनबाई प्रणिता भालके ११,१३८ मतांच्या मोठ्या फरकाने नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
या निकालामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मोठा राजकीय फटका बसला.
Pandharpur, 21 December : पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना धक्का देत भगीरथ भालके यांनी तब्बल 14 वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले आहे. आमदार (स्व.) भारत भालके यांच्या सूनबाई प्रणिता भालके ह्या तब्बल 11 हजार 138 इतक्या मोठ्या मताधिक्यांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवित भगीरथ भालकेंनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे.
पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता भालके, तर भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रचारात दोन्ही बाजूंकडून अटीतटीचा प्रचार झाला होता. दोन्ही पॅनेलने प्रचारात आघाडी घेतली होती, त्यामुळे पंढरपूरच्या निकालाबाबत उत्सुकता होती.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहापासून पंढरपूरच्या शासकीय धान्य गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच प्रणिता भालके यांनी आघाडी घेतली, ती शेवटपर्यंत कायम राहिली. शेवटच्या फेरीत अखेर भालके यांनी 11 हजार 138 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
तब्बल 14 वर्षांनंतर पंढरपूर नगरपालिकेमध्ये सत्तांतर झाले आहे. यापूर्वी (स्व.) आमदार भारत भालके यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने सत्ता मिळवली होती. त्यानंतर भारत भालके यांच्या सूनबाई प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांचा अवघ्या 8,430 मतांनी पराभव झाला होता. पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत परिचारकांच्या सत्तेला सुरुंग लावत भगीरथ भालके यांनी त्या पराभवाचे उट्टे काढल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पंढरपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये गड आला पण सिंह गेला अशी अवस्था परिचारक गटाची झाली आहे. कारण परिचारक गटाचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत, तर भालके गटाचे 11 उमेदवार निवडून आले आहेत. यामध्ये माजी उपनगराध्यक्ष श्वेता डोंबे यांचा पराभव झाला. तर प्रभाग क्रमांक पाच ब मधून अपक्ष उमेदवार ओंकार जोशी 115 मतांनी विजयी झाले आहेत. माजी नगराध्यक्ष राजेश्री गंगेकर यांचाही धक्कादायक पराभव झाला आहे.
प्रभाग क्रमांक 17 मधून मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आल्या आहेत. माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे अवघ्या 14 मतांनी विजयी झाले आहेत. भोसले यांनी परिचारक गटाचे पक्षनेते गुरुनाथ अभ्यंकर यांचा पराभव केला आहे.
नगराध्यक्षपद निकाल जाहीर होताच भालके गटाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर येऊन फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. जल्लोषावेळी भारत भालके यांचा नातू व नूतन नगराध्यक्ष प्रणिता भालके यांचा मुलगा शौर्य भालके यांनी गाडीच्या टपावर उभा उभे राहून दंड थोपटले, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला आहे.
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच प्रणिता भालके या आघाडीवर असल्याने भाजपाच्या गोटामध्ये शांतता होती. प्रत्येक फेरीत भालकेंना लीड मिळत गेले, ते लीड शेवटपर्यंत टिकून राहिले. शेवटच्या नवव्या फेरीअखेर भालके यांना 11 हजार 138 इतक्या मतांनी विजयी घोषित करण्यात आले. या संपूर्ण निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याचे निकालानंतर दिसून आले आहे.
परिचारकांचे नसते धाडस अंगलट
पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद हे खुले होते. मात्र, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी खुल्या जागेवर ओबीसी उमेदवार दिला होता. त्याच ठिकाणी भाजपची उमेदवार निवडीत चूक झाल्याचे मानले जात आहे. मराठा समाजातही त्यातून वेगळे संदेश गेला, त्यामुळे ओबीसी उमेदवार देण्याचा परिचारकांचा निर्णय अंगलट आल्याचे मानले जात आहे.
प्रस्थापितांच्या छाताडावर बसून विजय मिळवला : प्रणिता भालके
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य व स्वाभिमानी जनतेने मला निवडून दिले आहे. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मी समर्पित करते. प्रस्थापितांच्या छाताडावर बसून हा विजय मिळवला आहे. आजच्या विजयामुळे (स्व.) आमदार भारत नाना भालके यांची मला खूप आठवण येते. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर यापुढे मी काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया नूतन नगराध्यक्ष प्रणिता भालके यांनी दिली.
पंढरपूर नगराध्यक्षपदी कोण निवडून आले? – तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.
प्रणिता भालके किती मतांनी जिंकल्या? – त्या ११,१३८ मतांच्या दणदणीत फरकाने विजयी झाल्या.
या निवडणुकीत भाजपला काय नुकसान झाले? – १४ वर्षांनंतर भाजपची सत्ता गेली आणि प्रमुख नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.
या निकालाचे राजकीय महत्त्व काय? – विधानसभा पराभवाचा बदला घेत भालके गटाने पंढरपूरमध्ये पुन्हा वर्चस्व सिद्ध केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.