MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जावळीतील प्रतापगड कारखाना 'अजिंक्यतारा' चालविणार.... शिवेंद्रसिंहराजे

Umesh Bambare-Patil

सातारा : जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्‍वावर चालविण्‍यास घेण्‍याचा निर्णय शेंद्रे (ता. सातारा) येथे झालेल्‍या अजिंक्‍यतारा कारखान्‍याच्‍या सर्वसाधारण सभेत घेण्‍यात आला. या निर्णयामुळे जावळीतील सर्व शेतकऱ्यांच्‍या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍‍वासही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्‍यक्‍त केला.

अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर आज सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्‍यात आले होते. सभेसाठी ‘अजिंक्‍यतारा’चे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, ज्‍येष्ठ संचालक रामचंद्र जगदाळे, लालासाहेब पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती वनिता गोरे, जिल्‍हा बँकेच्‍या संचालिका कांचन साळुंखे, सुरेश सावंत यांच्‍यासह कारखान्याचे संचालक उपस्‍थित होते.

या सभेत प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्त्‍वावर चालविण्‍यास घेण्‍याचा विषय मांडण्‍यात आला. त्यास सर्व संचालकांनी तसेच सभासदांनी एकमताने पाठिंबा दिला. त्यानंतर शिवेंद्रसिंहराजे म्‍हणाले, ‘‘सातारा तालुक्‍याचे भाग्‍यविधाते (कै.) भाऊसाहेब महाराजांनी दूरदृष्टीने उभारलेल्‍या अजिंक्‍यतारा कारखान्‍याचा आज वटवृक्ष झाला आहे. ‘अजिंक्‍यतारा’मुळे सभासद, शेतकऱ्यांचा विकास झाला आहे.

जावळीतील शेतकऱ्यांच्‍या विकासासाठी प्रतापगड कारखाना चालविण्‍यास घेण्‍यात येणार असून त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्‍या आर्थिक विकासाला चालना मिळेल. जावळीतील शेतकऱ्यांच्‍या पाठीशी ‘अजिंक्‍यतारा’ खंबीरपणे उभा राहणार असून ‘प्रतापगड’च्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची चिंता त्यामुळे दूर होईल. गेली अनेक वर्षे प्रतापगड कारखान्‍याचे कामकाज अनिश्‍चिततेच्‍या भोवऱ्यात अडकले होते.

तांत्रिक व इतर बाबींमुळे या कारखान्‍याचे अस्‍तित्‍व संपुष्‍टात येण्‍याची चिन्‍हे निर्माण झाली असतानाच ‘प्रतापगड’ कारखाना ‘अजिंक्‍यतारा’ चालविण्‍यास घेणार असल्‍याच्‍या चर्चांना सातारा आणि जावळी तालुक्‍यांत वेग आला. त्याच अनुषंगाने प्रतापगड कारखान्‍याच्‍या संचालक मंडळाकडूनही त्‍या चर्चांना दुजोरा देण्‍याचे काम सुरू होते. चर्चा, प्रतिचर्चांमुळे जावळीतील शेतकऱ्यांच्‍या नजरा ‘अजिंक्‍यतारा’ पर्यायाने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍या भूमिकेकडे लागू्न राहिल्‍या होत्‍या. ‘प्रतापगड’चा निर्णय अजिंक्‍यतारा कारखान्‍याच्‍या सर्वसाधारण सभेत झाल्‍याने जावळीतील ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांमध्‍ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT