Satara BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : जयकुमार गोरेंनी डाव टाकलाच; ‘सातारा झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार, त्यासाठी सगळे प्रयत्न करू’

Jaykumar Gore Statement : सातारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीला बहुमत असतानाही भाजप अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे साताऱ्यातील सत्ता संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Vijaykumar Dudhale

Satara, 15 February : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या भारतीय जनता पक्षाला 27 जागांपर्यंतच मजल गाठता आलेली आहे. विरोधात लढलेल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीने 35 जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे त्यांनी झेडपीत सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, आता भाजपनेही डाव टाकला असून सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार, त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू, असे विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केले आहे, त्यामुळे साताऱ्यात सत्तासंघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्यात बोलताना ‘सातारा जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसण्यासाठी आम्ही सगळे मिळून सामुदायिक प्रयत्न करू, असं मी सगळ्यांना अश्वस्त करेन,’ असेही जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी स्पष्ट केले.

सातारा जिल्हा परिषदेच्या 65 जागांपैकी सर्वाधिक 27 जागा ह्या भारतीय जनता पक्षाने (BJP) जिंकल्या आहेत, तर दोन नंबरला 20 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस आहे. शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी केली होती, त्यामुळे या आघाडीकडे बहुमत आहे. पण महायुती म्हणून भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सातारा भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

जयकुमार गोरे म्हणाले, मी खात्रीनं सांगतो, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच होणार. त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. नेतृत्व म्हणून नेतृत्व प्रयत्न करेल. त्यामुळे कोणी असं समजायचं कारण नाही की, आमच्या जागा कमी आल्या म्हणून अध्यक्ष आमचा होणार नाही. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही, म्हणून आम्ही प्रयत्न सोडणार, असंही होणार नाही.

सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, हे वास्तव आहे. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविण्यासाठी आम्ही सामूहीकपणे प्रयत्न केले, तरी त्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुलीही गोरे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT