

भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचाच महापौर असेल, अशी घोषणा केली आहे. पाच वर्षांसाठी महापौरपद भाजपचा तर उपमहापौर शिवसेनेचा राहणार असे मत पवार यांनी म्हटलं आहे.
जळगावमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेनेची एक गुप्त बैठक हॉटेलमध्ये गुरुवारी(ता.25) सायंकाळी पार पडली.जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीत जागावाटपाबाबतही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. मात्र,या बैठकीचं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रण देण्यात आलं नसल्याचं समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष नजीब मुल्ला, आनंद परांजपे आणि आम्ही हे गेली २५ वर्षांपासून एकत्रच होतो. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते एकमेकांसमोर लढत आहेत, याचं आम्हाला दुःखच होतं. एकमेकांविरोधात बोलायचं कुठेतरी थांबत असेल आम्ही त्याचे स्वागतच करू.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिशा दिली तर आम्ही ठाण्यातील सर्व कार्यकर्ते त्या दिशेवर चालू. निवडणुकीच्या अगोदर किंवा नंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, असा अंदाज आहे.
अजितदादा पवार आमच्यासाठी परके नाहीत, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर आम्ही महाराष्ट्रात नक्कीच जोरदार पुनरागमन करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मनोज प्रधान यांनी सांगितले.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी वाटपाचा फार्म्युला निश्चित करण्यात आलेला आहे. २०१७ च्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नगरसेवकांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. पुणे भाजपकडून १०० जणांची यादी अंतिम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या हिंदुत्वावर शंका उपस्थित केली होती. मात्र, फडणवीस हे अल्लाह हाफीज म्हणाले होते, असा दावाही राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी केलेल्या दाव्यानंतर नवी मुंबईतील मनसे नेते गजानन काळे यांनी फडणवीस यांचा अल्लाह हाफीज म्हणताचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
मी सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार असेल तर ते मला काही बरोबर वाटलं नाही. पक्ष मोठा होत असताना निष्ठावंतांवर अन्याय होऊ नये, एवढीच भूमिका मी मांडत होते. काही दलाल आणि आपल्याच घरात तिकिटं मिळावीत, यासाठी हे राजकारण झालेले आहे.
मला कोंडीत पकडायचे असेल तर त्यांनी मला कोंडीत पकडावं. मी कशालाही घाबरत नाही. माझ्या भूमिकेसाबत आमच्या पक्षाचे जुने नेते उभे राहिले असते तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश गेला असता. मंत्री गिरीश महाजन यांना चुकीची माहिती दिली गेली आहे, त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नाही, असे आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.
बेलापूरच्या भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट द्यावं तसेच एकाच कुटूंबात एकापेक्षा जास्त व्यक्तींना उमेदवारी देऊ नये असे कणखर मत व्यक्त केले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार करावा. तसेच बेलापूर मतदारसंघात 40 जागा शिवसेनेने सोडाव्या अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश आणि पक्षांतराला वेग आला असून भाजपसह सत्ताधारी पक्षात इनकमिंग वाढले आहे. एकीकडे ठाकरे बंधू मुंबई महापालिकेसाठी एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे पुण्यात पवारांच्या दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येत आहेत.
तर, भाजपतही जोरात पक्षप्रवेश सुरू आहेत. नाशिक भाजपमध्ये गुरुवारी अनेक पक्षप्रवेश होत असून मनसेच्या माजी आमदाराचाही भाजपात प्रवेश होत आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मात्र, भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवत अनुपस्थित राहणे पसंत केले. त्यामुळे, स्थानिक भाजप नेत्यांच्या अनुपस्थितीतच हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पुणे : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, अशातच पुण्यात भाजपची 165 उमेदवारांपैकी 100 उमेदवारांची पहिली यादी तयार झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. 26 डिसेंबरला ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. बाकी जागांवरचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे. आज ही यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठवली जाणार आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथे भाजप ठाणे जिल्हा विभाग कार्यालयात पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सेवादलचे उपाध्यक्ष शेखर पाटील, संजीव शिंदे, गणेश नाईक यांच्यासह काँग्रेस सेवादलचे पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे भाजप शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेखर पाटील यांचा भाजप प्रवेश पार पडला.
पक्ष विरोधी कारवायां बद्दल नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी एक्सपोस्ट द्वारे तशी माहिती दिली आहे,
नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी नाराज व्यक्त केली आहे. फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'परिसरात ड्रोन घिरट्या घालताना आढळला. याबाबत पोलिसांनी माहिती देण्यात आली आहे. पोलिस घटना स्थळी पोहचले आहेत. आजुबाजूच्या परिसरात एका प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडविल्याची माहिती मिळाली आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. बैठकीत जागांचा फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत चर्चा करून त्यांना देखील सोबत घेणार असल्याचे माहिती आहे. राष्ट्रवादी सोबत चर्चानंतर महायुती तसेच अंतिम उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार याबाबत जवळपास निर्णय निश्चित झाल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय शरद पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतला आहे. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जगतापावर सडकून टीका केली होती.
या टीकेला प्रशांत जगताप यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे, 'मी विचारधारा मान्य करून लोकांच्या मतांवर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आहे. अमोल मिटकरी यांच्यासारख्या विदूषक आणि फुटकळ आमदाराच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही.
ज्यांची ग्रामपंचायत ही निवडून येण्याची लायकी नाही त्यांच्यावर मी काय बोलावं? अमोल मिटकरी हे तडजोड करणारे विदुषी आणि फुटकळ नेते आहेत. जे लोकांतून निवडून आलेले असतील त्यांनी माझ्याशी बोलावं', असं म्हणत प्रशांत जगताप यांनी प्रत्युत्तर दिलं.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून (25 डिसेंबर) पॅसेंजर सुविधा सुरू होणार आहे. दिवसभरात एकूण 30 विमानांची येजा होणार असून 4 हजार प्रवाशी याचा लाभ घेणार आहेत.
नगरपालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर 'विझलो जरी मी, हा माझा अंत नाही...' अशी पोस्ट लिहिणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याचा दुसऱ्याच दिवशी अपघाती मृत्यू झाला. कारंजा शहरातील मनसेचे पदाधिकारी हरिश हेडा यांच्या दुचाकीला एका भरधाव पिक-अप वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील स्टेशनच्या बांधकामात वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मुंबई महापालिकेने संबंधित काम तात्काळ बंद करण्याची नोटीस बजावत थांबवलं आहे.
नाताळ सुट्यांच्या पाश्र्वभूमीवर 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सामान्य भाविकांसाठी तुळजाभवानी मातेचे महाद्वार बंद करण्याचा निर्णय मंदीर संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. या कालावधीत भाविकांना कुंभार गल्लीतील झुलत्या पायऱ्यांवरून मंदीरात सोडण्यात येणार आहे.
तर 200 रुपयांचे सशुल्क दर्शन पास तसेच रेफरल दर्शन पास बंद असणार आहे. मात्र. व्हीआयपींसह 500 रुपयांचे स्पेशल दर्शन पास,अभिषेक पूजा व सिंहासन पुजेच्या भाविकांना महाद्वारातुन सोडण्यात येणार आहे. 28 डिसेंबर पासून तुळजाभवानी मातेचा शांकभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. भाविकांना सुलभ दर्शन व भाविकांचा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर येथे बस आणि कंटेनरचा अपघात होऊन लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर घडला आहे. कंटेनर ट्रक डिव्हायडरला धडकला आणि नंतर बसला धडकल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.