Prithviraj Chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prithviraj Chavan News : राज्यात मोदींविरोधात वातावरण; अनपेक्षित निकाल लागतील, पृथ्वीराज चव्हाणांचं गणित

Sunil Balasaheb Dhumal

Satara Lok Sabha News : महाराष्‍ट्रातील वातावरण मोदींच्‍या विरोधात आहे. लोकसभेची ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून महाराष्‍ट्रात ठिकठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागतील, असा विश्‍‍वास माजी मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी पत्रकार परिषदेत व्‍यक्‍त केला.

पृथ्‍वीराज चव्‍हाण Prithviraj Chavan म्‍हणाले, महाराष्‍ट्रातील वातावरण मोदींच्‍या विरोधात आहे. लोकसभेची ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली असून महाराष्‍ट्रात ठिकठिकाणी अनपेक्षित असे निकाल लागतील. सातारा मतदारसंघाला उज्‍वल परंपरा आहे. येथील जनतेने कधीच जातीयवादी शक्‍तींना थारा दिलेला नाही, असा घणाघातही चव्हाणांनी केला.

इंडिया आघाडीने प्रामुख्‍याने लोकशाहीच्‍या संरक्षणासाठी तसेच संविधान टिकविण्‍यासाठी व समतेचा अधिकारी कायम ठेवण्‍यासाठी समविचारी पक्षांसोबत घेतलेले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना जनतेने मोठ्या संख्‍येने शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांना पाठिंबा दिला आहे. पक्ष सोडून गेलेल्‍या लोकांना जनता येथे थारा देत नाही, हे वेळोवेळी सिध्‍द झालेले आहे. त्‍यामुळे या निवडणुकीत शशिकांत शिंदे हे मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील निवडणुकीत ९ मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे भाजपला फायदा झाला. समतावाद्याचे नेतृत्‍व करण्‍याची संधी ॲड. प्रकाश आंबेडकरांना Prakash Ambedkar होती. मात्र, त्‍यांनी ती गमावली आहे. त्‍यांनी आमच्‍यासोबत यावे, ही आमची इच्‍छा आहे. त्‍यांच्‍याशी चर्चा करण्‍यासाठी गेलेल्‍या इंडिया आघाडीच्‍या नेत्‍यांना त्‍यांनी अपमानित केले. तरीही आमचे प्रयत्‍न सुरुच आहेत. जिल्‍ह्यात दुष्‍काळाची गंभीर परिस्‍थिती असून दुष्‍काळाशी सामना करण्‍यासाठी प्रशासनाने तयारी केलेली आहे, मात्र राज्‍यातील असंवेदनशील सरकारने त्‍याबाबतचा आदेश काढला नसल्‍याचा आरोप आमदार चव्‍हाण यांनी केला.‍

मतविभागणी टाळण्‍यासाठी एकत्र

भाजपकडे देशात केवळ ३० टक्‍के मते आहे, उर्वरित ७० टक्‍के मते ही काँग्रेस आणि इतर पक्षांकडे आहेत, त्‍यामुळे या मतांची विभागणी होऊ नये, यासाठी आम्‍ही एकत्र आलो आहोत, त्‍याचा परिणाम निवडणुकीत दिसेल, असे आमदार चव्‍हाण म्‍हणाले.

रशिया, चीनची स्‍थिती भारतातही

मोदींची गॅरंटी असे म्‍हणत व्‍यक्‍तिस्‍तोम माजविण्‍याचा प्रकार सुरु आहे. रशिया, चीन या देशांमध्‍ये जे घडले, तेच भारतातही घडविण्‍यासाठी प्रयत्‍न मोदींकडून सुरु आहेत. संविधानाचा आत्‍मा काढून ढाच्‍या तसाच ठेवण्‍यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न सुरु आहेत.

ईव्‍हीएमवर जनतेचा विश्‍‍वास नाही

ईव्‍हीएम मशीनद्वारे मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेण्‍याची मागणी काँग्रेसने वेळोवेळी केली होती. आता भारतातील जनताही ईव्‍हीएम मशिनवर विश्‍‍वास नसल्‍याचे सांगत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT