Satara, 31 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दहा वर्षे संचालकपदाच्या नव्या नियमाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत राज्यात झाली नसल्यामुळे मातब्बर विद्यमान संचालक पुन्हा शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. बॅंकेचा सोसायटी मतदारसंघ हा सर्वाधिक प्रतिष्ठेचा आणि चुरशीचा असतो. त्यातून मातब्बर पुन्हा निवडणुकीत रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातील संभाव्य लढतीची चर्चा जिल्ह्यात चांगलीच जोर धरू लागली आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून, २७ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवल्या आहेत. दाखल हरकतींवरील सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने रणधुमाळीला रंगत येणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या सोसायटी मतदारसंघातून अनेक मातब्बर नेतेमंडळी नशीब अजमावत असतात. त्याचप्रमाणे अनेक आमदार, खासदार, मंत्री आणि झेडपी सदस्य याच मतदारसंघातून बॅंकेवर जाणे पसंत करतात, त्यामुळे याच मतदारसंघात सर्वाधिक चुरस दिसून येते.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतील सोसायटी गटातील संभाव्य लढती...
फलटणमध्ये पुन्हा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर
फलटण सोसायटी मतदारसंघ (१३२ मते) : फलटण सोसायटी मतदारसंघात दोन्ही राजे गटात २५ मतांचा फरक असल्याचे सांगितले जात आहे. येथे विद्यमान संचालक रामराजे नाईक-निंबाळकर यांचे फलटण व गुणवरे सोसायटीतून दोन ठराव आहेत. तसेच, संजीवराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांचेही ठराव झाले आहेत. याशिवाय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटातील समशेरसिंह नाईक-निंबाळकर व शिवरुपराजे खर्डेकर यांचेही ठराव आहेत. माजी खासदार निंबाळकरांचे बंधू समशेरसिंह रिंगणात उतरल्यास चुरस वाढणार आहे.
गोरे बंधूंमध्ये कोण वरचढ ठरणार?
माण सोसायटी (७६ मते) : विद्यमान संचालक शेखर गोरे यांचे बोथे व महिमानगड सोसायटीतून ठराव झाले आहेत. त्यामुळे ते रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्यांचे बंधू आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावाचे आंधळी, बिदाल, बोडके सोसायटीतून तीन ठराव आहेत. मनोज पोळ आणि महेंद्र देसाई यांचेही ठराव असल्याने गोरे बंधूंपैकी कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे लक्ष लागले आहे.
जावळीत पुन्हा रंगणार जुनाच सामना
जावळी सोसायटी (४८ मते) : मागील वेळी एका मताने जिंकलेले ज्ञानदेव रांजणे यांचा यावेळी केळघर सोसायटीतून ठराव केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा हुमगाव सोसायटीतून ठराव करण्यात आला आहे, त्यामुळे यांच्यात पुन्हा जुनाच सामना रंगणार का, याची उत्सुकता आहे.
भोसले-पाटील युती बाळासाहेब पाटलांची डोकेदुखी वाढवणार
कऱ्हाड सोसायटी (१४६ मते) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उदयसिंह उंडाळकर पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार डॉ. अतुल भोसले यांचे जुळलेले गणित कायम राहिल्यास माजी सहकार मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांची अडचण वाढू शकते.
शंभूराज देसाईपेक्षा पाटणकर तुल्यबळ
पाटण सोसायटी : पाटण तालुक्यात सत्यजितसिंह पाटणकर आणि याज्ञसेन पाटणकर गटाने ठरावांमध्ये आघाडी घेतली आहे, त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि रविराज देसाई यांच्या तुलनेत पाटणकर गटाचे पारडे जड मानले जात आहे.
शिवेंद्रराजेंसोबत नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार
सातारा सोसायटी मतदारसंघ : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान संचालक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह वेदांतिकाराजे भोसले यांच्याही नावाचे ठराव झाले आहेत. त्यासोबतच जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, लक्ष्मण कडव, आर. वाय. जाधव यांचेही ठराव असल्याने आता जिल्हा बॅंकेत शिवेंद्रराजेंसोबत आणखी कोणाची एन्ट्री होणार, याची उत्सुकता आहे.
नितीन पाटलांचे पारडे जड; मदन भोसले गट काय करणार?
वाई-खंडाळा-महाबळेश्वर : वाई-खंडाळा-महाबळेश्वर गटातून खासदार नितीन पाटील यांच्या समर्थकांचे बहुतांश ठराव झाले आहेत. त्यामुळे नितीन पाटील यांचे पारडे या मतदारसंघातून जड मानले जाते. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघात लक्ष घातले असून भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्याकडून मदन भोसले गटाला ताकद दिली जात आहे. त्यामुळे मदन भोसले जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मकरंदआबा खरेदी विक्रीतून लढणार
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील हे खरेदी विक्री संघातून निवडणूक लढतात. यावेळीही त्यांचे जिल्हा खरेदी विक्री संघासह १२ संघांतून ठराव झाले आहेत, त्यामुळे ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे, त्यामुळे दोन्ही भाऊ पुन्हा बॅंकेत दिसण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.