Double Decker Bus sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Double Decker Bus : पुणेकरांसाठी मोठी बातमी: शहरात पुन्हा धावणार 'डबलडेकर'; या 10 मार्गांवर लवकरच होणार ट्रायल

Pune To Launch Double Decker Bus Trial On Non Metro Routes : मुंबईच्या 'बेस्ट' उपक्रमातील 'डबलडेकर' बस प्रमाणेच पुण्यात देखील पुन्हा एकदा 'डबलडेकर' बस सेवा सुरू केली जाणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणेकरांचा प्रवास अधिक सुसाट करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ आता नवीन प्रयोग करणार आहे. पुणे शहरात पुन्हा एकदा 'डबलडेकर' बस सेवा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, येत्या २१ जुलैपासून शहरातल्या १० वेगवेगळ्या मार्गांवर या बसची ट्रायल रन घेतली जाणार आहे. तसेच पुढे याच मार्गाने ही सेवा उपलब्ध होणार आहे.विशेष म्हणजे, ज्या भागात सध्या बीआरटी किंवा मेट्रोची सुविधा उपलब्ध नाही, केवळ त्याच मार्गांवर या डबलडेकर बसेस धावणार आहेत.

असा असेल 'डबलडेकर'चा प्लॅन!

या चाचणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. मुंबईच्या 'बेस्ट' उपक्रमाला डबलडेकर बस पुरवणाऱ्या प्रसिद्ध 'स्विच' कंपनीचे अधिकारी नुकतेच पीएमपीच्या अधिकाऱ्यांना भेटले आहेत. ही कंपनी सोमवार, २० जुलै रोजी चाचणीसाठी एक खास बस उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर मंगळवार, २१ जुलैपासून दोन्ही कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होईल.

मेट्रो आणि बीआरटी नसलेले मार्ग टार्गेट

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, "डबलडेकर बसची ही चाचणी अगदी नवीन पद्धतीने घेतली जात आहे. ज्या भागात मेट्रो आणि बीआरटी सेवा उपलब्ध नाही, केवळ त्याच भागात या बसचे संचालन केले जाईल. म्हणूनच चाचणीसाठी देखील अशाच मार्गांची निवड करण्यात आली आहे." या निवडक १० मार्गांमध्ये प्रामुख्याने हडपसर-वाघोली आणि हडपसर-स्वारगेट या अत्यंत महत्त्वाच्या आणि गर्दीच्या मार्गांचा समावेश करण्यात आला आहे.

जुन्या अनुभवातून घेतला धडा!

यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये हिंजवडी परिसरात डबलडेकर बसची चाचणी घेण्यात आली होती. मात्र, आता त्या मार्गावर 'मेट्रो ३' येत असल्याने भविष्यात प्रवाशांची संख्या विभागली जाण्याची शक्यता होती. सोबतच, पहिल्या चाचणीदरम्यान प्रशासनाला काही तांत्रिक अडचणींचाही सामना करावा लागला होता.

हाच जुना अनुभव पाठीशी ठेवून, प्रशासनाने आता मेट्रो नसलेल्या आणि प्रवाशांची मोठी संख्या असलेल्या नवीन मार्गांवर पुन्हा चाचणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता २१ जुलैपासून सुरू होणारी ही चाचणी यशस्वी होणार का आणि पुणेकरांना कधीपासून या डबलडेकर सफारीचा आनंद घेता येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT