Pune police department transfer latest news: अल्पवयीन आरोपींना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढल्याच्या प्रकरणाने पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील चार पोलीस अधिकारी आणि ११ पोलीस अंमलदार अशा एकूण १५ जणांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर झालेल्या या प्रशासकीय कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आरोपी मुलांना कारच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या घटनेची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत पुणे पोलिसांच्या कामकाजावर संताप व्यक्त केला होता. पोलिसांकडून कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
दरम्यान, याच पोलीस ठाण्यातील आणखी एका प्रकरणात आरोपींना बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातही राज्य मानवाधिकार आयोगाने कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले.
सीआयडीकडून गुन्हा; आयुक्तांचे बदलीचे आदेश
अल्पवयीन आरोपींची धिंड काढण्याच्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडून सुरू आहे. या चौकशीनंतर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांमध्ये तीन पोलीस उपनिरीक्षक आणि एका सहायक पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या चार अधिकाऱ्यांची विशेष शाखेत, तर ११ पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली केली आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांवरून हटविण्यात आले आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या?
विशेष शाखेत बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल संभाजी थोरात, पोलीस उपनिरीक्षक निलेश राजेंद्र मोकाशी, अण्णा मधुकर दराडे आणि सद्दाम हुसैन दस्तगीर फकीर यांचा समावेश आहे.
पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलेल्या अंमलदारांमध्ये सुनील दादा हनवते, दिनेश विनायक तापकीर, मितेश दत्तात्रय चोरमले, सागर चंद्रकांत बोरगे, सोहम कैलास शेंडकर, मंगेश जयसिंग पवार, राहुल अशोक औंधकर, रवींद्र शंकर गायकवाड, संदीप लक्ष्मण आगळे, तुकाराम पंडित सुतार आणि सुवर्णा दत्तात्रय भिसे यांचा समावेश आहे.
मानवाधिकार आयोगाची नाराजी, सीआयडीचा तपास आणि त्यानंतर झालेल्या १५ पोलिसांच्या बदल्या, यामुळे पुणे पोलीस दलातील या प्रकरणाची गंभीरता अधोरेखित झाली आहे. सीआयडीच्या पुढील तपासातून या प्रकरणात आणखी काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.