Pune Graduate And Teachers Constituency Election; BJP Chandrakant Patil, NCP Hasan Mushrif And Shivsena Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : एकनाथ शिंदे, मुश्रीफांवर पुन्हा नवं धर्मसंकट? पुणे शिक्षक, पदवीधरमध्ये बंडखोरीचे सावट; कारभाऱ्यांनी शड्डू ठोकलाच

Pune MLC Election Seat Sharing Dispute : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या जागा वाटपावरून महायुतीत वाद पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेमुळे एकनाथ शिंदे आणि मुश्रीफांवर पुन्हा नवं धर्मसंकट येण्याची शक्यता आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : विधान परिषदेच्या पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा जागा वाटपावरून महायुतीमध्ये घमसान सुरू आहे. जवळच्या कारभाऱ्यांनाच उमेदवारी मिळवण्यामध्ये नेते अपयशी ठरत असल्याने कारभाऱ्यांनीच या निवडणुकीमध्ये शड्डू ठोकण्याचे ध्येय ठेवले आहे. कारभाऱ्यांच्या या भूमिकेमुळे नेते धर्म संकटात सापडणार आहेत. त्यामुळे उमेदवारी मिळवण्यासाठी शिक्षक मधील एका कारभाऱ्याने थेट दिल्ली गाठण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय पदवीधर मधील एका कारभाऱ्याने थेट मंत्र्यांची भेट घेऊन आपण या निवडणुकीत शड्डू ठोकणार असल्याचं जाहीर सांगितले आहे.

पुणे शिक्षक मतदार संघामध्ये राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष असलेल्या विवेकानंद शिक्षण सोसायटीचे कार्यकारी संचालक कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रयत्नशील आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दोघांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. शिवाय प्रचारात दोघांचीही आघाडी आहे. जागा वाटपामध्ये सध्या पुणे शिक्षक मतदार संघ ही भाजपकडे जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे सहाजिकच गावडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे. गेल्या दोन वर्षापासून शिक्षक मधून निवडणुकीची तयारी करत असणाऱ्या मंगेश चिवटे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी दबाव वाढवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मंत्री आणि शिवसेनेच्या आमदारांच्या गाठीभेटी वाढवल्या असून प्रत्येकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत उमेदवारी मिळवण्यासाठी शब्द टाकण्याची फिल्डिंग लावली आहे.

शिवाय प्रसंगी दिल्ली गाठण्याची तयारीही त्यांनी केली आहे. भाजपकडून लढण्याची तयारी ठेवली असल्याचे सांगितले जाते. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय चिमटे यांना अंतिम असणार आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत चुरस निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अखेरच्या क्षणापर्यंत तानातानी सुरूच आहे. अशातच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक हे दोन्ही मतदार संघ हे परंपरागत भाजपचेच असल्याचे जाहीर करत येत्या 48 तासात दोन्ही उमेदवारांची घोषणा होणार असल्याचे भाष्य सांगलीत केले.

सहाजिकच राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून उमेदवारीचा शब्द घेतला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. तर दुसरीकडे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने हे देखील राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. लाड यांची उमेदवारी भाजपकडून निश्चित समजली जाते. त्यामुळे माने यांची माघार असणार का याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष आहे.

तत्पूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून माने यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माने यांनी नुकतीच मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण ही निवडणूक लढवणार आहे. महायुतीमध्ये सूत्रानुसार विद्यमान जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आली पाहिजे.

शिवाय अरुण लाड यांनी अजूनही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला नसल्याने ही जागा हक्काने राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे, असा युक्तिवाद मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या निवडणुकीत आपण 'नो कम बॅक' करणार असल्याचे सांगितले जाते. नुकतेच त्यांनी प्रसार माध्यमांमध्ये आपल्या उमेदवारीचा ट्रीझर इमेज प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे माने हे जर निवडणुकीच्या रिंगणात राहिले तर पुन्हा एकदा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर धर्मसंकट उडवणार हे निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT