पुणे शिक्षक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत. महायुतीकडून भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे उमेदवार आमदार जयंत आसगावकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. आमदार आसगावकर हे अनुभवाच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर गावडे पहिल्यांदाच आपल्या कामाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत.
प्रत्यक्ष मतदानासाठी दहा दिवस शिल्लक असताना दोन्ही उमेदवारांनी प्रचारात सातत्य ठेवले आहे. गावडे यांच्या प्रचारासाठी तब्बल सात ते आठ मंत्र्यांसह आजी-माजी खासदार आणि विद्यमान आमदारांची फौज मैदानात उतरली आहे. तर आसगावकर यांच्यासाठी माजी मंत्री, खासदार आणि आमदारांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ हा काही अपवाद वगळता भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. अशा परिस्थितीत भाजपने या मतदारसंघातून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कौस्तुभ गावडे या युवा उमेदवाराला संधी दिली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि बावनकुळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी गावडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले. राज्यातील सत्तेचा परिणाम या मतदारसंघातील विजय-पराजयावर होतो, हे मागील निवडणुकीतून समोर आले आहे. त्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी अर्धा डझनहून अधिक मंत्री प्रचारात सक्रिय झाले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, कोल्हापूरचे मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी गावडे यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका घेतली आहे. याशिवाय कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील महायुतीचे आजी-माजी खासदारही प्रचारात उतरले आहेत.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची तब्बल 8 हजार मते, तसेच उजव्या विचारसरणीच्या शिक्षक संघटनांचा पाठिंबा ही गावडे यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. त्याचबरोबर मंत्री, आमदार आणि खासदारांशी संबंधित शिक्षण संस्थांचा पाठिंबा मिळत असल्याने मताधिक्याच्या दृष्टीने गावडे यांची बाजू मजबूत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे उमेदवार जयंत आसगावकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. ते सध्या पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळात सत्तेचा फायदा आसगावकर यांना झाला होता. गेल्या 5 वर्षांत केलेली कामगिरी आणि अनुभवाच्या जोरावर ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासोबतही दिग्गज नेत्यांची फौज उभी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते आसगावकर यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. भारती विद्यापीठ, रयत शिक्षण संस्था आणि डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समूह यांचा पाठिंबा ही आसगावकर यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने शिक्षकांच्या अनेक शैक्षणिक समस्या सोडवण्यात अपयश आल्याचा मुद्दा आसगावकर यांच्या प्रचारात मांडला जात आहे. शिक्षकांच्या मागण्यांसाठी त्यांचा सातत्याने लढा सुरू असल्याने डाव्या विचारसरणीच्या शिक्षक संघटनांचा पाठिंबा त्यांना मिळत असल्याचे चित्र आहे.
या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांचा विचार करता पुणे शिक्षक मतदारसंघात कोणाचा विजय सोपा होणार, हे ऐनवेळी जुळून येणाऱ्या राजकीय समीकरणांवरून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर आसगावकर बाजी मारणार की गावडे यांच्या प्रचारयंत्रणेचा आणि राजकीय ताकदीचा फायदा त्यांना मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.