MLC Election : पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांनी बंडाचे निशाण फडकावत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. चिवटेंच्या भूमिकेला शिवसेनेतील काही बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याचे चित्र असतानाच सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी काही तासांतच आपली भूमिका बदलली आहे.
आधी ‘आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, मंगेश चिवटेंना नाही’ अशी स्पष्ट भूमिका घेणाऱ्या शहाजीबापूंनी आता चिवटेंना पाठिंबा जाहीर केला आहे. एवढेच नाही, तर मंगेश चिवटेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (६ ऑक्टोबर) पुण्यात उपस्थित राहणार असल्याचे सांगत त्यांच्या प्रचाराचीही ग्वाही दिली आहे.
भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर मंगेश चिवटे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून या मतदारसंघाची तयारी करणाऱ्या चिवटेंनी आपण पुण्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले
चिवटेंनी आपल्या या निर्णयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश असल्याचेही सांगितले. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मंगेश चिवटे हेच शिवसेनेचे उमेदवार असल्याची भूमिका मांडली. चिवटेंचा अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शनात दाखल केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
सामंत यांच्यासोबत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिवसेनेचे अन्य नेते उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर महायुतीत बंडखोरीची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू असतानाच शहाजीबापू पाटील यांनी मात्र चिवटेंपासून अंतर घेतले होते.
शहाजीबापूंनी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, पण मंगेश चिवटेंना नाही.’ पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळायला हवी होती, मात्र ती मिळाली नाही. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार आपण काम करू, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
इतकेच नाही तर मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज भरणार आहेत की नाहीत, याचीही आपल्याला माहिती नसल्याचे शहाजीबापूंनी म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेमुळे शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत मतभेदांवर चर्चा सुरू झाली होती.
मात्र, शहाजीबापूंच्या या भूमिकेला काही तास उलटत नाहीत तोच त्यांनी यू-टर्न घेतला आहे. आता मंगेश चिवटेंना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे सांगत शहाजीबापूंनी मंगेश चिवटेंच्या उमेदवारीला समर्थन दिले. मंगळवारी पुणे येथील आयुक्त कार्यालयात चिवटेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच चिवटेंना मनापासून समर्थन देऊन त्यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची ग्वाही शहाजीबापूंनी दिली आहे.
शहाजीबापू पाटील यांच्या या काही तासांतील भूमिकाबदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आधी चिवटेंना विरोध करून पक्षाच्या आदेशानुसार काम करण्याची भूमिका आणि त्यानंतर थेट चिवटेंच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय यामागे शिंदेंच्या आदेशाची भूमिका किती महत्त्वाची ठरली, याची चर्चा सुरू झाली आहे.
एकीकडे भाजपने कौस्तुभ गावडेंना उमेदवारी दिली आहे, तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे समीकरण आता अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.