

Solapur, 04 October : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी देताना भारतीय जनता पक्षाने जोरदार धक्कातंत्र वापरले आहे. शिक्षक मतदारसंघासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला कात्रजचा घाट दाखवत भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक मंगेश चिवटे यांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यांनी आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांना स्वजिल्ह्यातून धक्का बसला असून सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आमचा पाठिंबा शिवसेनेला, मंगेश चिवटे यांना नाही, असे विधान केले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मंगेश चिवटे यांनी गेली दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. पण हा मतदारसंघ भाजपने सोडण्यास नकार दिला आहे. त्यांनी या मतदारसंघातून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीचा शब्द दिलेल्या शरद लाड यांना डावलून डॉ स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर केली आहे, त्यामुळे महायुतीमधील सर्व पक्षांच्या इच्छुकांमध्ये नाराजी आहे.
विशेषतः शिक्षक मतदारसंघ भाजपकडे गेल्याचे लक्षात येताच शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी आपण निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. पण त्यांच्या पाठीशी किती नेते उभे राहतात. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पण चिवटे यांच्या सोलापूर जिल्ह्यातील नेतेमंडळी त्यांच्या पाठीशी उभी राहतात की नाही, अशा सवाल उपस्थित होत आहे. त्याला कारण सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी घेतलेली भूमिका ठरली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची घोषणा मंगेश चिवटे यांनी केली आहे. मात्र, त्यावरून आता शिवसेनेतच नाराजीचा सूर उमटला आहे. सांगोल्याचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी एक मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे.
पुणे शिक्षक मतदार संघात आमचा पाठिंबा शिवसेनेला आहे, मंगेश चिवटे यांना नाही, असं शहाजीबापू पाटील म्हटले आहे. वास्तविक, आमच्या पक्षाला (शिवसेना) ही जागा मिळायला पाहिजे होती. मात्र, ती मिळाली नाही. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार आम्ही काम करू, असेही त्यांनी म्हटले म्हणाले.
विशेष म्हणजे, ‘मंगेश चिवटे हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत की नाहीत, हे मलाच माहिती नाही,’ असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी चिवटेंच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे, त्यामुळे मंगेश चिवटे खरंच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.