Dr. Babasaheb Deshmukh – Sanjay Ingole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Dcc Bank Election : गणपतराव देशमुखांच्या आमदार नातवाला शेकाप कार्यकर्त्यानेच दिले कडवे चॅलेंज : पक्षांतर्गत संघर्षाची ठिगणी पेटली...

Dr. Babasaheb Deshmukh News : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत सांगोल्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून आमदार बाबासाहेब देशमुख यांना स्वपक्षातील कार्यकर्त्याने आव्हान दिले आहे. या लढतीची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दत्तात्रय खंडागळे

Sangola, 22 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत सांगोला तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्याने चॅलेंज दिले आहे. पक्षाचे आमदार, त्याच पक्षाचा कार्यकर्ता आणि भाजपप्रणित पॅनेलमधून लढणारे आमदार, असे या निवडणुकीचे वेगळे राजकीय समीकरण तयार झाले आहे. संख्याबळाचा विचार करता आमदार देशमुख यांचे पारडे जड मानले जात असले, तरी पक्षातील कार्यकर्त्यानेच दिलेले आव्हान ही निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची बाब ठरली आहे.

तालुक्यातील अ वर्ग विविध कार्यकारी सेवा संस्था मतदारसंघात एकूण ८० मतदार आहेत. या मतदारसंघातून भाजपप्रणित विकास पॅनेलच्या माध्यमातून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, शेकापचे कार्यकर्ते आणि एखतपूरचे रहिवासी असलेले संजय इंगोले यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने आमदार देशमुख यांना निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.

इंगोले यांनी यापूर्वी बाजार समितीचे १० वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. विशेष म्हणजे, शेकापचे आमदार भाजपप्रणीत पॅनेलमधून निवडणूक लढवीत असताना शेकापच्याच कार्यकर्त्याने त्यांच्या विरोधात अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. त्यामुळे ही निवडणूक केवळ दोन उमेदवारांमधील लढत न राहता पक्षांतर्गत भूमिका, राजकीय निष्ठा आणि स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांची कसोटी ठरत आहे.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यामागे शेकापचे संघटनात्मक बळ, भाजप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे गटाचे पाठबळ असल्याने त्यांचे संख्याबळ तुलनेने अधिक असल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातील सुमारे ४५ मतदार शेकापशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संख्याबळाच्या गणितात आमदार देशमुख यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, हेच संख्याबळ पक्षातील नाराजी किंवा मतदारांची भूमिका प्रत्यक्ष मतदानात कशी व्यक्त होते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, संजय इंगोले यांनी आपण (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या विचारधारेतून भाजपविरोधी स्वाभिमानी पॅनेलच्या भूमिकेला पाठिंबा देत निवडणूक लढवत असल्याची भूमिका मांडली आहे. आपण अपक्ष असलो तरी सर्वपक्षीय मतदारांकडून गुप्त मतदानाच्या माध्यमातून पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पक्षीय समीकरणांपलीकडे जाऊन काही मतदार इंगोले यांच्या बाजूने उभे राहतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 'कपबशी', तर संजय इंगोले यांना 'खाटारा' हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या दोन्ही चिन्हांवर शेकापने अनेक निवडणुका लढवल्या आहेत. आमदार देशमुख यांच्या प्रचारासाठी पॅनेलमधील नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

एकीकडे आमदारांच्या विजयाचे गणित संख्याबळावर मांडले जात असताना दुसरीकडे पक्षातीलच कार्यकर्त्याने दिलेले आव्हान राजकीय चर्चेचा विषय बनले आहे. सहकारातील या निवडणुकीत पक्षीय ताकद निर्णायक ठरणार की गुप्त मतदानातून मतदार वेगळा कौल देणार, याची उत्सुकता सांगोला तालुक्यात निर्माण झाली आहे.

बाबासाहेब देशमुखांकडे सर्वाधिक मतदार

या मतदारसंघातील ८० मतदारांपैकी सुमारे ४५ मतदार शेकापशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना संख्याबळाचा मोठा आधार आहे. त्यात भाजप आणि माजी आमदार दीपक साळुंखे गटाची साथ मिळत असल्याने त्यांची बाजू भक्कम मानली जात आहे. मात्र, शेकापच्या कार्यकर्त्यानेच पक्षाच्या आमदारांविरोधात उमेदवारी कायम ठेवल्याने पक्षातील मतांचे विभाजन होते का, हा या निवडणुकीतील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT