Pune News : महायुतीचे राज्यात सरकार आले आहे. पण प्रचारावेळी लाडक्या बहिणींना योजनेच्या रक्कमेत बदल करण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी आता 2100 रूपये कधी देणार? असा सवाल करत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एका मंत्र्याने लाडकी बहीण योजनेचा 2100 चा हप्ता मार्च महिन्यात महिलांना दिला जाईल, असे म्हटले आहे.
लोकसभा तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीवेळी लाडली बहण योजनेने भाजपला चांगले यश मिळवून दिले होते. यानंतर राज्यातील विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली होती. ज्यात महिलांना 1500 रूपये दिलं जात आहेत. मात्र प्रचारावेळी महायुतीने आम्ही लाडक्या बहिणींना सरकार आल्यावर 1500 नाही तर 2100 देऊ असे आश्वासन दिले होते. आता सरकार आले असून या घोषणेची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न महिलांना पडला आहे. तर राज्यातील महिला 2100 रुपयांची वाट पाहत आहेत.
दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या 2100 रू हप्त्यावरून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी या योजनेतील पात्र महिलांना 2100 रुपये मार्च महिन्यात मिळतील असा दावा केला आहे. ते नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.
माध्यमांशी संवाद साधला विखे पाटील म्हणाले, मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता ₹1500 वरुन ₹ 2100 केला जाईल. मार्च महिन्यात अर्थ संकल्प असून यानंतर लाडक्या बहिणींना आश्वासनाप्रमाणे 2100 रुपये मिळणार आहेत. 3 मार्च 2025 रोजी राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेचा समावेश असेल असे म्हटले जात आहे.
राहुल गांधी यांच्यावर टीका
यावेळी त्यांनी काँग्रेस आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभेवेळी राहुल गांधी यांनी प्रत्येक महिलेला 6 महिन्यात खटाखट पैसे देऊ असे आश्वासन दिले होते. दिले का? नाही. ते असेच खोटी आश्वासने देत असतात. यामुळेच त्यांना जनतेनं नाकारलं आहे.
पण आम्ही आमचं सरकार आल्यावर खटाखट नाही तर पटापट पैसे देऊ असे म्हटले होते. ते आम्ही पटापट दिले. मिळाले की नाही? आमचे सरकार खटाखट नाही तर पटापट देणारं आहे, अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर केली आहे.