उमेश महाजन
Sangola, 17 February : सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहूद गावात आज उजनीतून सांगोला तालुक्यातील २२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या (स्व.) बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘केवळ तुताऱ्या फुंकून पाणी येत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते, असा टोलाही त्यांनी माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व इतर नेत्यांना लगावला.
सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून ही योजना करण्यात येणार आहे. या योजनेचा सांगोला तालुक्यातील दुष्काळी गावांना मोठा फायदा होणार आहे. या कार्यक्रमासाठी राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांच्यासोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार ॲड्.शहाजी पाटील, दीपक साळुंखे उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, स्वतःला जाणते राजे म्हणून घेणाऱ्या या भागातील नेत्याने राज्याचे आणि देशाचे अनेक वर्षे राजकारण केले आहे. मात्र, या नेतृत्वाने दुष्काळी भागाला न्याय देताना नेहमीच वेगळी भूमिका घेतलेली आहे. दुष्काळी भागाला पाणी देणे परवडणारे नाही, ते व्यवहार्य नाही, असेच ते आजपर्यंत सांगत आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मात्र महाराष्ट्रातील दुष्काळ मुक्तीचा ध्यास घेतला आहे, त्या दृष्टीने राज्यात कामे सुरू आहेत, त्यामुळे केवळ तुताऱ्या फुंकून पाणी येत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते. अशी खोचक टिप्पणीही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या भागातील नेत्यांना आणि पुढाऱ्यांना लगावली.
सांगोला तालुक्याचे (स्व.) गणपतराव देशमुख यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या कार्यकाळातही गणपतराव देशमुख यांनी पाणी योजनांसाठी अथक परिश्रम घेतले. सांगोल्याच्या दुष्काळमुक्तीसाठी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांनीही मोठे काम केले आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात भारतीय जनता पक्षाचा हात आहे’ असा आरोप केला आहे. त्यावरून विखे पाटील यांनी राऊतांना टोला लगावला आहे. राजकीय मनोरुग्णांची संख्या राज्यात वाढत आहे, अशा मनोरुग्णांना ताबडतोब दवाखान्यात दाखल करावे; अन्यथा जनता त्यांना उत्तर देईल, असेही विखे यांनी सुनावले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.