Kolhapur News : कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेला राजकीय संघर्ष आता राज्याच्या सीमाही ओलांडून राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. अध्यक्ष निवडीसाठी समविचारी आघाडीकडे बहुमत असतानाही कोरमअभावी निवड प्रक्रिया रखडली आहे. त्यातच महायुती सरकारने गोकुळवर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या निर्णयामुळे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे. आता या मुद्द्यावर थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडत भाजपवर टीका केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू असलेल्या वादात आतापर्यंत राज्यातील अनेक प्रमुख विरोधी नेत्यांनी सतेज पाटील यांची बाजू घेतली होती. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. मात्र, आता चार शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याच्या निर्णयावरून राहुल गांधी यांनीही भाजपला लक्ष्य केले आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमधून गोकुळच्या सत्तासंघर्षावर भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. मात्र, निवडणुकीनंतर नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती करत संचालकांचे संख्याबळ १२ वरून १६ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार असून जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली.
सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दूध उत्पादकांची मते हिरावून घेणाऱ्यांना शेतकरी विसरणार नाहीत, असा इशाराही त्यांनी आपल्या पोस्टमधून दिला.
दरम्यान, गोकुळवरील शासननियुक्त संचालकांची नावे शनिवारी (ता. ७) जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. नियुक्त संचालकांना अध्यक्ष निवडीच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पुढील तीन दिवसांत पूर्ण केली जाऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या राजकीय समीकरणात या चार संचालकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
गोकुळच्या अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेला हा वाद आता केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित राहिलेला नाही. राहुल गांधी यांनी थेट हस्तक्षेप केल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडी या मुद्द्यावर महायुती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आगामी अध्यक्ष निवड आणि शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.