Rahul Kul-Sharad Pawar-Prashant Paricharak  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP Election Officer : शरद पवारांशी नाते सांगणाऱ्या माढा, बारामती लोकसभेची जबाबदारी कुल-परिचारकांवर!

या दोन्ही मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : भारतीय जनता पक्ष निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागला असून पक्षाकडून विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित नेत्यांवर निवडणूक प्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पवारांचे एकेकाळचे निकटवर्तीय दौंडचे आमदार राहुल कुल आणि माढ्याची जबाबदारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघातून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवडणूक लढवलेली आहे. (Rahul Kul is InCharge of Baramati, while Prashant Paricharak is Chief Election Officer of Madha)

आमदार राहुल कुल (Rahul Kul) हे एकेकाळी पवारांचे आवडते शिष्य होते. विशेष म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघाला जोडूनच कुल यांचा दौंड मतदारसंघ आहे. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेत राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभा लढवून जिंकली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भाजपध्ये प्रवेश केला होता.

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश मानून त्यांनी ती निवडणूक खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवली हेाती. त्या निवडणुकीची मोठी चर्चा राज्यभरात झाली होती.

आताही फडणवीस यांनी कुल यांच्यावर बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. या मतदारसंघात इंदापूर, बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे, दौंड, खडकवासला येथे भाजपचे, तर पुरंदर आणि भोरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील जबाबदारी ते कशी पेलतात, याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

माढा लोकसभेची जबाबदारी ही माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्यावर आहे. पंढरपूर तालुक्यातील जवळपास ७० गावे ही माढा मतदारसंघात आहेत, उर्वरीत गावे ही सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहेत, त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून परिचारक यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परिचारक हे भाजपपासून दुरावल्याची चर्चा होती. मात्र, भाजपने पुन्हा त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात फलटण, माढा, करमाळा या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि समर्थक आमदार आहेत. माळशिरस, माणमध्ये भाजपचे आणि सांगोल्यात शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून परिचारक यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत.

बारामती आणि माढा लोकसभा मतदारसंघ हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. कारण या दोन्ही मतदारसंघातून पवार यांनी निवडणूक लढवलेली आहे. तसेच हे मतदारसंघ कायम पवारांशी नाते सांगणार आहेत, त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघावर भाजपने या वेळी विशेष जोर लावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT